उच्च न्यायालयाने तपास ‘ए.टी.एस्.’कडे वर्ग केल्याच्या आदेशाची प्रत उपलब्ध न झाल्याने दोष निश्चितीसाठी पुढील सुनावणी २३ ऑगस्टला !

कॉ. पानसरे हत्या प्रकरण

कोल्हापूर, ५ ऑगस्ट (वार्ता.) – उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचे अन्वेषण आतंकवादविरोधी पथकाकडे (‘ए.टी.एस्’कडे) वर्ग करण्यात आले आहे; मात्र या आदेशाची लेखी प्रत अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यामुळे ती मिळाल्यावरच पुढील प्रक्रिया करण्यात यावी, अशी विनंती सरकार पक्षाच्या वतीने अधिवक्ता शिवाजीराव राणे यांनी कोल्हापूर येथील न्यायालयास केली. ही विनंती न्यायालयाने मान्य केली. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत उपलब्ध न झाल्याने दोष निश्चितीसाठी पुढील सुनावणी आता २३ ऑगस्टला होणार आहे. ही सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू असून संशयितांच्या वतीने अधिवक्ता समीर पटवर्धन हे काम पहात आहेत.

या खटल्यात एकूण १२ संशयित आरोपी असून त्यातील येरवडा, पुणे येथील कारागृहात असणारे सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना, तसेच कर्नाटकतील बेंगळुरू येथील अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, भारत कुरणे, अमित डेगवेकर, अमित बद्दी आणि गणेश मिस्कीन यांना प्रत्यक्ष उपस्थित करण्यात आले होते. दोन संशयित पसार आहेत, असे सरकार पक्षाचे म्हणणे आहे. या प्रकरणी जामिनावर असलेले समीर गायकवाड हेही या प्रसंगी उपस्थित होते.

या प्रसंगी बेंगळुरू येथून उपस्थित करण्यात आलेले अमित डेगवेकर यांनी ‘आम्हाला  बेंगळुरू येथून हातात बेड्या घालून चारचाकी गाडीतून आणण्यात येते. हे पुष्कळ त्रासदायक ठरते. तरी प्रवासाच्या कालावधीत आम्हाला बेड्या घालण्यात येऊ नयेत, असे पोलिसांना सांगण्यात यावे’, अशी विनंती न्यायालयात केली. संशयितांची संख्या अधिक असल्याने आज मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अधिवक्ता समीर पटवर्धन यांची ‘संशयितांच्या नातेवाइकांना त्यांना भेटण्याची अनुमती मिळावी’, ही मागणी मान्य करण्यात आली.