पुणे येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपीसह त्याच्या आईलाही अटक !

पुणे – येथील मावळ तालुक्यातील ७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आता आरोपी तेजस दळवी आणि त्याची आई सुजाता दळवी यांनाही कामशेत पोलिसांनी अटक केली आहे. या घृणास्पद प्रकारात पुरावे नष्ट करण्यासाठी तिने साहाय्य केल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले आहे. न्यायालयाने नराधम तरुणासह त्याच्या आईला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ‘आरोपीला फाशी द्या’, या मागणीसाठी ४ ऑगस्ट या दिवशी मावळातील पवनानगर येथे सर्वपक्षीय आणि नागरिक यांच्या वतीने निषेध मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले, तसेच याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र देऊन सदर खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी याकरिता प्रयत्न करावेत, अशी मागणी करणार असल्याचे या वेळी आमदार उमा खापरे यांनी सांगितले आहे.

कामशेत पोलिसांनी सांगितले की, २ ऑगस्ट या दिवशी मुलगी बेपत्ता झाल्याने मुलीच्या वडिलांनी तिचे घराजवळून अपहरण झाल्याची तक्रार कामशेत पोलिसात नोंदवली होती. दुसर्‍या दिवशी गावातील जिल्हा परिषद शाळेमागे विचित्र अवस्थेत तिचा मृतदेह आढळला, शवविच्छेदन अहवालातून हत्येपूर्वी चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून कामशेत पोलिसांनी २४ घंट्यांच्या आत तेजसला अटक केली होती.

संपादकीय भूमिका

  • समाजाची मानसिकता किती पराकोटीची रसातळाला गेली आहे, हे दर्शवणारी घटना !
  • विकृत नराधमांना आणि त्यांना साहाय्य करणार्‍यांनाही त्वरित आणि कठोर शिक्षा झाल्यासच अशा प्रकारांना काही प्रमाणात तरी आळा बसेल !