पुणे – आज्ञापालन, नम्रता, गुरूंवरील दृढ श्रद्धा आणि शरणागतभाव या गुणांचा समुच्चय असलेले सासवड (पुणे) येथील श्री. यशवंत वसाने (वय ७५ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. सद्गुरु स्वाती खाडये यांच्या वंदनीय उपस्थितीत १ ऑगस्ट २०२२ या दिवशी झालेल्या एका भावसत्संगात ही आनंदवार्ता सर्व साधकांना मिळाली. सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के) यांनी प्रारंभी भावप्रयोग घेतला. ‘गुरुदेवांच्या चरणांशी शरण जाऊन कसे प्रयत्न करायला हवेत ? काय भाव ठेवायला हवा ?’ याविषयी सौ. मनीषा पाठक यांनी सांगितले. या भावप्रयोगामुळे सत्संगातील सर्व वातावरण भावमय झाले. त्यानंतर सौ. मनीषा पाठक यांनी श्री. यशवंत वसानेकाकांमधील गुणांचे भावपूर्ण वर्णन करून श्री. वसानेकाका जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्याचे घोषित केले. सद्गुरु स्वाती खाडये यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाचे छायाचित्र आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. ‘या आनंदवार्तेच्या माध्यमातून नागपंचमीच्या पूर्वसंध्येला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी भावभेटच दिली’, असा सर्व साधकांचा भाव होता.
वसानेकाका करत असलेले आज्ञापालन पाहून त्यांची गुरुदेवांवरील दृढ श्रद्धा लक्षात येते ! – सद्गुरु स्वाती खाडये
श्री. यशवंत वसानेकाकांना देवद येथील सनातनच्या आश्रमात जाऊन सेवा करण्यासाठी सांगितल्यावर त्यांनी कशाचाही विचार न करता आणि मनात कोणतीही शंका न आणता लगेच आज्ञापालन केले. आश्रमजीवनाचा लाभ झाल्याने त्यांना साधनेतही साहाय्य झाले. या वयातही त्यांनी केलेल्या आज्ञापालनातून त्यांची गुरुदेवांवरची दृढ श्रद्धा दिसून येते. त्याविषयी त्यांचे विशेष कौतुक वाटते. कोणतीही सेवा भावपूर्ण आणि मनापासून केली, तर ती देवाजवळ पोचते. काकांनी आश्रमात राहून स्वतःतील गुणांमुळे सर्वांचे
मन जिंकले.
सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के)
श्री. वसानेकाका कोणत्याही सेवेसाठी सदैव तत्पर असतात. त्यांच्यातील भाव पाहून आपलाही भाव जागृत होतो.
श्री. यशवंत वसानेकाकांचे मनोगतसद्गुरु स्वातीताईंचे मार्गदर्शन, पू. वटकरकाकांचा सत्संग आणि साधकांनी केलेले साहाय्य यांमुळे साधनेतील प्रयत्नांना दिशा मिळाली ! – यशवंत वसानेआश्रमात गुढीपाडवा साजरा होत असतांना झालेल्या शंखनादाच्या वेळी ‘साक्षात् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आश्रमाच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये येत आहेत’, असे मला अनुभवता आले. त्या दिवशी पूर्ण २ घंटे मला भावस्थिती अनुभवता आली. सद्गुरु स्वातीताईंकडे माझ्या साधनेतील अडचणी मोकळेपणाने बोललो नसतो, तर त्यांचे मार्गदर्शन मिळाले नसते आणि मी घरीच बसून राहिलो असतो. आश्रमात प्रत्येक साधकाकडून काही ना काही शिकायला मिळते. ‘सेवेत त्रुटी राहू नये; म्हणून साधक कसे प्रयत्न करतात ?’, हेही शिकायला मिळते. मागच्या वेळी मी सद्गुरु स्वातीताईंना म्हणालो होतो, ‘‘प्रयत्न करतो आहे; पण प्रगती का होत नाही ?’’ त्या वेळी सद्गुरु ताई म्हणाल्या, ‘‘आता होईल.’’ त्यांचे तेवढेच वाक्य मनात ठेवले आणि सद्गुरुताईंनी सांगितल्याप्रमाणे आश्रमात गेलो. आश्रमात पू. वटकरकाकांचा सत्संग आणि त्यांचे दिशादर्शन मला साधनेत पुष्कळ साहाय्य करत आहे. त्यांच्याशी मोकळेपणाने बोलल्यामुळे मला अनेक वेळा प्रयत्नांची दिशा मिळते. माझे काही चुकले, तर ते प्रेमाने जाणीव करून देतात. त्यांच्याविषयी मला पुष्कळ कृतज्ञता वाटते. |
श्री. यशवंत वसानेकाकांची नातेवाइकांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये
यजमानांच्या निधनानंतर मला आणि मुलाला आधार देऊन साधना शिकवली ! – श्रीमती कांचन वसाने (श्री. यशवंत वसाने यांच्या वहिनी)
माझ्या यजमानांचे देहावसान होऊन २० वर्षे होऊन गेली. एवढी वर्षे दादांनी (श्री. यशवंत वसाने यांनी) मला आणि माझ्या मुलाला अगदी प्रेमाने सांभाळले. दादांनी मला आधार दिला आणि साधना शिकवली. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आपल्या पाठीशी आहेत. ते आपला सांभाळ करणार’, असे सांगून ते मला नेहमी आश्वस्त करायचे. माझा जुना भ्रमणभाष संच खराब झाल्यामुळे ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकतांना अडचण येत होती, तर त्यांनी लगेच मला नवीन भ्रमणभाष संच घेऊन दिला.
‘घर म्हणजे गुरुदेवांचा आश्रम आहे’, असा भाव असणारे वसानेकाका ! – श्री. प्रसाद वसाने (श्री. यशवंत वसाने यांचे पुतणे)
वसानेकाकांची गुरुदेवांवर पुष्कळ श्रद्धा आहे. घरात ‘एका आसंदीवर गुरुदेव विराजमान आहेत. घर म्हणजे गुरुदेवांचा आश्रम आहे’, असा त्यांचा भाव असतो. एकदा सद्गुरु स्वातीताई सत्संगासाठी घरी आल्या होत्या. त्या वेळी त्या ज्या आसंदीवर बसल्या होत्या, त्या आसंदीवर काका कुणाला बसू देत नसत. ‘सद्गुरु ताई त्या खुर्चीवर बसल्या आहेत’, असा त्यांचा भाव होता. काकांचे वय पुष्कळ आहे, तरीही ते संपूर्ण घर नीटनेटके आणि व्यवस्थित ठेवतात.