सांगे येथील ७३ सरकारी भूखंड बळकावले

पणजी, २ ऑगस्ट (वार्ता.) – सरकारच्या मालकीचे सांगे येथील तब्बल ७३ भूखंड अनधिकृतपणे बळकावल्याचे उघड झाले आहे. या भूखंडांची परस्पर विक्री करण्यात आली आहे. भूखंड विक्री करण्याचा हा प्रकार वर्ष २०१३ पासून चालू होता, अशी माहिती भूमी बळकावल्याच्या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विशेष अन्वेषण पथकाचे प्रमुख तथा पोलीस अधीक्षक (गुन्हे विभाग) निधीन वाल्सन यांनी दिली आहे. (गेल्या ९ वर्षांत भूखंड बळकावले जात असल्याचा थांगपत्ता न लागणारे निद्रिस्त प्रशासन ! – संपादक)

ते पुढे म्हणाले, ‘‘सांगे तालुक्याच्या मामलेदारांनी सरकारच्या मालकीचे ७३ भूखंड बळकावल्याची तक्रार करून याविरोधात प्रथमदर्शनी अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंद करण्याची मागणी विशेष अन्वेषण पथकाकडे केली आहे. अनधिकृतपणे कागदपत्रे सिद्ध करून हे भूखंड विकण्यात आले आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.’’ या प्रकरणी मोठ्या प्रमाणात अटक होण्याची शक्यता आहे. पोलीस अधीक्षक (गुन्हे विभाग) निधीन वाल्सन यांनी या वेळी पुढील सूत्रे सांगितली.

१०० भूखंडांशी निगडित ३५ प्रकरणांचे गुन्हे अन्वेषण विभागाकडून अन्वेषण

अनुमाने १०० भूखंडांशी निगडित ३५ प्रकरणांचे गुन्हे अन्वेषण विभागाकडून अन्वेषण केले जात आहे. यामधील २८ प्रकरणे इतर विभागांकडून विशेष अन्वेषण पथकाकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहेत, तर उर्वरित ७ प्रकरणे गुन्हे अन्वेषण विभागाने नोंद केलेली आहेत.

अटक केलेल्या ९ पैकी ८ जणांचा जामीन संमत

भूमी बळकावल्याच्या प्रकरणातील प्रमुख आरोपी महंमद सोहील सफी याची पत्नी अंजुम शेख हिला विशेष अन्वेषण पथकाने अटक केली आहे. भूमी बळकावल्याच्या प्रकरणी आतापर्यंत एकूण ९ जणांना अटक करण्यात आली असून यामधील ८ जणांना जामीन मिळालेला आहे. जामीन मिळालेल्या संशयितांनी अन्वेषणाला सहकार्य न केल्यास त्याचा जामीन रहित करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात येणार आहे.

विदेशात असलेल्या भूमीच्या मालकांनी त्यांच्या भूमीची कागदपत्रे पडताळून पहाण्याचे आवाहन

आतापर्यंत ज्या भूमीचा मालक नाही किंवा भूमीचा मालक विदेशात वास्तव्यास आहे, अशा भूमी बळकावण्यात आल्या आहेत. विदेशात वास्तव्यास असलेल्या भूमीच्या मालकांनी त्यांच्या भूमीची कागदपत्रे पडताळून पहावीत आणि काही गैरप्रकार आढळल्यास विशेष अन्वेषण पथकाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सांगे येथील ‘सोशियाद प्राट्योटिका दोस बालडियोस दास नोव्हास कॉन्क्चिस्तास’ या सोसायटीच्या सदस्यांच्या विरोधात गुन्हा नोंद

सांगे – तालुक्यातील उगे, पाटे आणि कष्टी येथे सरकारच्या नावावर असलेली सुमारे २० सहस्र चौ.मी. भूमी बनावट मालकी आणि इतर कागदपत्रे सिद्ध करून विक्री करून सरकारची फसवणूक केल्याच्या प्रकरणी विशेष अन्वेषण पथकाने सांगे येथील ‘सोशियाद प्राट्योटिका दोस बालडियोस दास नोव्हास कॉन्क्चिस्तास’ या सोसायटीच्या ६ सदस्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. सांगेचे मामलेदार राजेश साखळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सरकारच्या नावावर असलेला भूखंड स्वत:च्या नावावर करून त्याची सुमारे ७१ जणांनी विक्री केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.