श्री. श्रीरंग कुलकर्णी हे सनातन संस्थेच्या साधिका आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे यांचे धाकटे बंधू असून ते जन्मतःच विकलांग आहेत. ते ऑगस्ट २०२१ पासून रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात राहून सेवा करत आहेत. १८.६.२०२२ (जेष्ठ कृष्ण पंचमी) या दिवशी त्यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने अधिवक्ता योगेश जलतारे यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. जिज्ञासा
मध्यंतरी श्री. श्रीरंग कुलकर्णी यांच्या बहिणीच्या (मधुवंतीताईंच्या) सासर्यांचे निधन झाले. तेव्हा श्रीरंगदादांनी मृतदेह नेण्यापूर्वी त्याला स्नान घातल्याचे पाहिले. तेथून परत आल्यावर त्यांनी मला विचारले, ‘मृतदेहाला स्मशानात नेण्यापूर्वी स्नान का घालतात ?’ यासंबंधी मी त्यांचे शंकानिरसन केल्यावर त्यांच्या तोंडवळ्यावर आनंद दिसला. त्यांनी मोकळेपणाने हसून ‘आता महत्त्व कळले’, असे सांगून जिज्ञासापूर्तीचा आनंद व्यक्त केला.
२. प्रेमभाव
श्री. श्रीरंग कुलकर्णी यांना ‘त्यांच्या भाच्याचा वाढदिवस कधी आहे ?’, हे चांगले लक्षात असते. त्यांनी आवर्जून त्या दिवशी भाच्याला भ्रमणभाष लावून मागितला आणि त्याला शुभेच्छा दिल्या. ते एरव्हीही मधे मधे त्यांच्या बहिणींना भ्रमणभाष लावून देण्यास सांगतात. ते त्यांची खुशाली विचारतात आणि स्वतः छान असल्याचे त्यांना सांगतात.
३. इतरांच्या वस्तूंची काळजी घेणे
मी श्रीरंग यांना आतापर्यंत ४ – ५ वेळा भ्रमणभाष लावून दिला आहे. तेव्हा माझ्या लक्षात आले, त्यांना छोट्या भ्रमणभाष संचावरून (फीचर फोनवरून) भ्रमणभाष लावून दिला, तर त्यांना तो हातात नीट पकडता येत असल्याने ते भ्रमणभाष स्वतःच्या हातात घेऊन बोलतात; परंतु ‘अँड्रॉइड’ भ्रमणभाष संचावरून भ्रमणभाष लावून दिल्यास तो हातातून पडण्याची भीती असल्याने ते भ्रमणभाष हातात न घेता ‘स्पीकर’ चालू करायला सांगतात आणि संच साधकांना त्यांच्याच हातात ठेवायला सांगून ते बोलतात. यावरून ‘त्यांना इतरांच्या वस्तूंची काळजी घेण्याची चांगली समज आहे’, हे शिकायला मिळाले.
४. दिसेल ते कर्तव्य
अ. एकदा भोजनकक्षाची सामूहिक स्वच्छता असतांना ते लगेचच तेथील साधकांच्या साहाय्यासाठी गेले.
आ. आश्रमात भाजी आली असतांना ते भाज्यांच्या वर्गीकरणाच्या सेवेसाठी स्वतःहून गेले.
इ. एकदा त्यांनी मला बोलावून आश्रमातील एका लादीच्या खालचा भाग मुंग्या पोखरत असल्याचे दाखवले. ते म्हणाले, ‘‘यावर लगेचच उपाय काढायला हवा, नाहीतर मुंग्यांमुळे लादी उखडली जाईल.’’
ई. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मला बोलावून एका छपरावरून पाणी गळत होते, ते दाखवले आणि त्यामुळे कोणीतरी पाय घसरून पडू शकेल, त्यासाठी त्या सूत्राविषयी प्रक्रिया करण्यास सांगितली. श्रीरंग ते सूत्र सांगून थांबले नाहीत, तर त्यांनी त्यावर पुढील उपाययोजनाही काढली. जेथे पाणी गळत होते, तेथे लगेचच त्यांनी एक बालदी आणून ठेवली. जेणेकरून गळणारे पाणी बालदीत पडेल.
शारीरिकदृष्ट्या विकलांग असूनही अशा सेवांसाठी त्यांना कुणी सांगावे लागत नाही. ते स्वयंस्फूर्तीने या कृती करतात. श्रीरंग यांचे गुण आणि त्यांची साधनेची चिकाटी आम्हा धडधाकट साधकांना लाजवणारी आहे. ‘त्यांची लवकरात लवकर आध्यात्मिक उन्नती करवून घ्यावी’, हीच गुरुचरणी प्रार्थना !’
– अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१०.२०२१)