पाकिस्तानचा पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवाद वाढवण्याचा प्रयत्न !

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

१. अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंड येथील शीख समाजाने एकत्र येऊन खलिस्तान्यांच्या विरोधात काम करणे

येणार्‍या काळात पंजाबला सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करायला पाहिजे. गेल्या काही मासांचा आढावा घेतला, तर हिमाचल प्रदेशच्या विधीमंडळाच्या ठिकाणीही खलिस्तान्यांनी खलिस्तानी आतंकवादाची भित्तीपत्रके लावण्याचा प्रयत्न केला होता. ऑस्ट्रेलिया किंवा कॅनडा येथील गुरुद्वारांमध्ये अनेक वेळा खलिस्तानी समर्थकांची भित्तीपत्रके लावली जातात. चांगली गोष्ट अशी की, अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंड येथील शीख समाजाची एकजूट होऊन तो खलिस्तान्यांच्या विरोधात काम करत आहे. त्यांना ठाऊक आहे की, खलिस्तानी आतंकवाद निर्माण करून काहीही उपयोग नाही. काही मासांपूर्वी पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार अस्तित्वात आले.

२. सीमा दुरक्षा दल, पंजाब पोलीस, गुप्तहेर संघटना आणि पंजाबचे नागरिक यांनी एकत्र येऊन खलिस्तानी आतंकवादाचा सामना करणे आवश्यक !

६ जून १९८४ या दिवशी ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ संपले होते. त्यात जर्नेलसिंग भिंद्रनवाले मारला गेला. या घटनेला ३८ वर्षे पूर्ण झाली; म्हणून गुरुद्वाराच्या दारांवर ‘खलिस्तानी झिंदाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. त्या वेळी अनेक फुटीरतावादी एकत्र आले होते. ते हातात तलवारी आणि जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचे फलक घेऊन खलिस्तानच्या स्वातंत्र्याची भाषा करत होते. ३८ वर्षांपूर्वी याच वेळेला ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ भिंद्रनवालेच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या आतंकवाद्यांना बाहेरच्या देशांतून साहाय्य मिळत असते. नुकतेच सुवर्णमंदिरात खलिस्तानी एकत्र आले होते. पंजाबमध्ये कायदा-सुव्यवस्था चांगली नाही. अमली पदार्थांचा व्यापार आणि गुन्हेगारी वाढत आहे.

नुकतीच काँग्रेसच्या एका नेत्याची हत्या केल्याचे वृत्त समोर आले होते. पंजाबमध्ये शेतकर्‍यांचीही परिस्थिती पुष्कळ चांगली नाही. बेरोजगारी वाढली असून त्याला बहुतेक करून आतंकवादी कारणीभूत आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान सुवर्णमंदिरात गेले होते. तेथे त्यांनी बंद दाराच्या आड तेथील जथ्थेदार (प्रमुख) ग्यानी हरप्रित सिंह यांची भेट घेतली होती. त्या वेळी ते म्हणाले होते की, तरुणांना हत्यारे चालवण्याचे प्रशिक्षण मिळाले पाहिजे. त्याच दिवशी अनेक संघटनांनी खलिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी मोर्चा काढला होता. यामध्ये परकीय शक्तींचा निश्चित हात आहे. या आतंकवादाकडे खलिस्तानचा आतंकवाद किंवा नार्कोटिकचा (अमली पदार्थांचा) आतंकवाद म्हणून बघायला नको, याचा संबंध काही प्रमाणात काश्मीरशीही आहे; कारण आपल्याला ठाऊक असेल की, पाकिस्तानमध्ये ‘ऑपरेशन काराकोरम’ केले होते. त्यात काश्मीरचा आतंकवाद, खलिस्तानचा आतंकवाद, तसेच उर्वरित भारतातील आतंकवाद सगळे एकत्र केले होते. त्यामुळे खलिस्तानी आतंकवाद अजिबात पुढे येणार नाही, या दृष्टीने कारवाई व्हायला पाहिजे. सीमा सुरक्षा दल, पंजाब पोलीस, गुप्तहेर संघटना आणि पंजाबचा समाज या सर्वांनी एकत्र येऊन खलिस्तानी आतंकवादाला तोंड देणे आवश्यक आहे !

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे