नागपूर – येथील ‘ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन’च्या वतीने शहरातील अनुमाने १० शाळांमध्ये ५ सहस्र विद्यार्थी पर्यावरणपूरक शाडूच्या गणेशमूर्ती घडवणार आहेत. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती पर्यावरणाला हानीकारक असल्यामुळे विद्यार्थी या मूर्ती त्यांच्या घरी ३१ ऑगस्ट या दिवशी म्हणजे गणेशचतुर्थीच्या दिवशी ते त्यांची स्थापना करतील, अशी माहिती प्रकल्प समन्वयक योगेश बन यांनी दिली. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मध्य नागपूर येथे शाळांची निवड केली जाईल. या शाळेत विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने प्रशिक्षण देऊन श्री गणेशमूर्तींची निर्मिती करण्यात येणार आहे, असे ‘ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन’चे अध्यक्ष अनिल सोले यांनी सांगितले.
निवड केलेल्या शाळांमध्ये मूर्तीकारांना पाठवण्यात येणार आहे. संबंधित शाळांतील चित्रकला शिक्षक विद्यार्थ्यांना साहाय्य करतील. विद्यार्थ्यांना माती, ब्रश, रंग आणि पाटी संस्थेच्या वतीने दिले जाईल. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’मुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी ‘ग्रीन गणेशा’ म्हणजेच ‘मातीतूनच घडवा गणेशमूर्ती’ हा संदेश देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. उपक्रमाच्या जनजागृतीसाठी आणि प्रत्येक शाळेशी संपर्क करण्यासाठी पर्यावरणप्रेमींचे पथक सिद्ध केले आहे, अशी माहिती योगेश बन यांनी दिली.