कानपूर येथील खासगी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांना शिकवली जात आहे इस्लामी प्रार्थना !

हिंदु संघटनांच्या विरोधानंतर गुन्हा नोंद

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील ‘फ्लोरेट्स इंटरनेशनल स्कूल’ या शाळेत हिंदु विद्यार्थ्यांना ‘कलमा’ (इस्लामी प्रार्थना) शिकवला जाण्याची घटना समोर आली आहे. याची माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचे पालक आणि हिंदु संघटना यांनी आंदोलन चालू केल्यावर पोलीस आयुक्त अन् प्रशासकीय अधिकारी शाळेत पोचले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून जिल्हाधिकार्‍यांनी चौकशीचा आदेश दिला आहे.  शाळेच्या व्यवस्थापनाने ‘यापुढे कलमा म्हणायला सांगणार नाही’, असे स्पष्ट केले आहे; मात्र हिंदु संघटनांनी शाळेचे शुद्धीकरण करून शाळेला टाळे ठोकण्याची मागणी केली आहे. ‘जोपर्यंत शाळेचे व्यवस्थापन क्षमा मागत नाही, तोपर्यंत आम्ही शाळा उघडू देणार नाही’, असेही त्यांनी म्हटले आहे. या शाळेतील एका पुस्तकातील एका पानाचे छायाचित्रही प्रसारित झाले आहे. याच्या तळाशी इस्लामी कलमा लिहिलेला आहे.

१.  येथील नगरसेवक महेंद्र शुक्ला यांनी शाळेवर गंगाजल शिंपडले. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. महेंद्र शुक्ला म्हणाले की, येथे राष्ट्रगीत म्हटले जात नाही; मात्र कलमा शिकवला जातो. यांचे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी संघटनेशी संबंध आहेत. याची चौकशी करू.

२. शाळेच्या व्यवस्थापकाने म्हटले की, आमच्या शाळेमध्ये १२-१३ वर्षांपासून हिंदु, मुसलमान, शीख आणि ख्रिस्ती प्रार्थना म्हटल्या जात आहे. आतापर्यंत कुणी विरोध केला नव्हता; मात्र ४ दिवसांपूर्वी पालकांनी याच्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर आम्ही या प्रार्थना बंद केल्या आहेत.

कलमा म्हणजे काय ?

‘ला-इलाह-इलल्लाहु मोहम्मदन रसुलिल्लाहि’ हा इस्लामचा एक कलमा (प्रार्थना) आहे. याचा अर्थ असा होतो की, एकटा अल्लाह सोडून कोणताही परमेश्‍वर नाही आणि महमंद हा त्याचा प्रेषित आहे.

संपादकीय भूमिका

एखाद्या शाळेमध्ये भगवद्गीतेतील श्‍लोक शिकवल्यास किंवा म्हणण्यास सांगितल्यावर मुसलमान किंवा ख्रिस्ती विद्यार्थी कधी म्हणतील का ?