गोव्यातील नद्या आणि समुद्रकिनारे प्रदूषित !

मोठ्या प्रमाणात आढळला ‘फिकल कॉलीफॉर्म’ जिवाणू

पणजी, ३१ जुलै (वार्ता.) – गोव्यातील प्रसिद्ध सुमद्रकिनारे विषारी झाले आहेत. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला उत्तर गोव्यातील मिरामार, कळंगुट, मोरजी, तेरेखोल आणि वागातोर, तर दक्षिण गोव्यातील मोबोर, बायणा, वेळसाव आणि गालजीबाग या समुद्रकिनार्‍यांवर ‘फिकल कॉलीफॉर्म’ नावाचा जिवाणू (मानवी आणि इतर प्राणी यांची विष्ठा यांवर वाढणारा जिवाणू) मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. यामुळे हे समुद्रकिनारे प्रदूषित झालेले आहेत.

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने वर्ष २०२१-२२ मध्ये पाण्याच्या नमुन्यांची चाचणी केली असता त्यांना मांडवी, झुआरी, साळ, तेरेखोल, शापोरा आणि सिकेरी या प्रमुख नद्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाल्या असल्याचे लक्षात आले. या नद्यांमध्ये ‘फिकल कॉलीफॉर्म’ नावाच्या जिवाणूचे प्रमाण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या प्रमाणाहून पुष्कळ अधिक आहे. तसेच वरीलपैकी काही नद्यांमध्ये प्राणवायूचे प्रमाण (बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड) नियमापेक्षा अल्प आहे. तसेच पाण्याचे ‘पी.एच्.’ (एखादे द्रावण आम्ल आहे कि अल्कली, हे मोजण्याचे एकक म्हणजे त्या द्रावणाचे पी.एच्. होय.) नियमानुसार नाही.

बहुतेक ठिकाणच्या प्रति १०० मि.ली. पाण्यात ११० ते ७९० एवढ्या प्रमाणात ‘फिकल कॉलीफॉर्म’ जिवाणू सापडले. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मते पाण्यामध्ये ‘फिकल कॉलीफॉर्म’ जिवाणू आढळण्यामागे अनेक कारणे आहेत; मात्र सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी नदीत किंवा समुद्रात सोडणे हे आहे. यामुळे गोव्यातील नद्या आणि समुद्रकिनारे यांना गंभीर धोका निर्माण झाला आहे.’’ (राज्यात अशा प्रकारे कुठे कुठे प्रकिया न करता सांडपाणी नद्या आणि समुद्र यांत सोडण्यात येते, त्याची शासनाने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी ! – संपादक)