प्रेरणादायी उपक्रम !

सोलापूर येथे प्रशासकीय कार्यालयांमध्ये १५ फेब्रुवारी ते ३० एप्रिल २०२२ या कालावधीत ‘सुंदर माझे कार्यालय’ हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये कार्यालयीन स्वच्छता, प्रशासकीय कामे यांवर अधिक भर दिला गेला. या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये ३०८ तलाठी कार्यालये, ८० मंडळ अधिकारी आणि १२ तहसील कार्यालये सहभागी झाली होती. या अभियानामुळे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये सकारात्मकता येऊन १२५ तलाठी कार्यक्षेत्रामध्ये ९० टक्के ‘ई-पीक पहाणी’ (यामध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने शेतीतील पिकांची पहाणी केली जाते. शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतामध्ये जाऊन तेथे पिकांची पहाणी करून त्याची नोंद भ्रमणभाषद्वारे महाराष्ट्र शासनाच्या ‘ई-पीक पहाणी’ या ॲपमध्ये करायची असते) पूर्ण झाली. ४९९ तलाठी कार्यक्षेत्रांमध्ये १०० टक्के सातबारा वाटप करण्यात आला, तर २६ मंडळ अधिकारी स्तरावर ८० टक्के वसुली झाली. या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना उत्कृष्ट सेवेचा लाभ मिळाला आहे. या अभियानाला मिळालेल्या लोकसहभागामुळे ७ तलाठी आणि ३ मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयांचे नवीन बांधकाम, तर मोडकळीस आलेल्या ३३ तलाठी अन् ८ मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयांची दुरुस्ती करण्यात आली. या उपक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘हा उपक्रम स्तुत्य असून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत तो कार्यक्षमपणे राबवावा.’’

शासकीय कर्मचार्‍यांनी मनात आणल्यास काय होऊ शकते, हे या उदाहरणातून प्रकर्षाने दिसून येते. मनावरील अयोग्य विचारांची झापडे बाजूला सारून योग्य विचारांची कास धरणे किती आवश्यक आहे, हेही यातून लक्षात येते. स्वच्छतेमुळे आपोआपच मनाला प्रसन्न वाटते. ज्या ठिकाणी स्वच्छता असते, तेथे सकारात्मक स्पंदने येतात. त्यामुळे मनही सकारात्मक होते, तसेच आपल्याकडे असणारी कामे वेळच्या वेळी पूर्ण केल्यास प्रलंबित कामांचे विचार मनातून निघून जातात आणि मन तणावमुक्त रहाते. त्यामुळे पुढे येणार्‍या कामांमध्ये मन पूर्ण क्षमतेने कार्य करते. अशा प्रकारे वेळच्या वेळी कामे पूर्ण करणे आणि कार्यालयीन स्वच्छता या मूलभूत गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सोलापूर जिल्ह्यातील हा प्रयोग यशस्वी झाल्याने राज्यात सर्व शासकीय कार्यालयांनीही उपक्रम राबवावा आणि जनतेची सेवा खर्‍या अर्थाने केल्याचा आनंद घ्यावा, असेच जनतेला वाटते.

– वर्षा कुलकर्णी, सोलापूर