सेवेची तळमळ, व्यष्टी साधनेचे गांभीर्य, सद्गुरु स्वाती खाडये आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले श्री. राजेंद्र महादेव माळी (वय ५१ वर्षे) ! 

श्रावण शुक्ल चतुर्थी (१.८.२०२२) या दिवशी कुमठे, तासगाव येथील श्री. राजेंद्र महादेव माळी यांचा ५१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची मुलगी कु. दीपाली माळी हिला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. राजेंद्र महादेव माळी यांना ५१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

श्री. राजेंद्र माळी

१. काटकसरी वृत्ती

‘माझे बाबा (श्री. राजेंद्र माळी) कपडे किंवा कोणतीही गोष्ट विकत घेतांना आवश्यक तेवढीच घेतात. मी पूर्वी पुष्कळ कपडे विकत घेत असे. तेव्हा त्यांनी मला ‘आवश्यक तेवढेच कपडे घ्यावेत’, असे प्रेमाने समजावून सांगितले. ते घरातील धान्याचा काटकसरीने वापर करतात आणि अधिक असलेले धान्य योग्य पद्धतीने साठवून ठेवतात.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने व्यावहारिक अडचणींवर मात करता येणे

त्यांना व्यावहारिक जीवनात अनेक अडचणी आल्या; परंतु केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे ते अडचणींवर मात करू शकले. त्यांचे व्यावहारिक जीवनातील प्रत्येक गोष्टीतील निर्णय अचूक असायचे. माझ्या शाळेपासून ते महाविद्यालयापर्यंतच्या जीवनातील अनेक निर्णय बाबांनी घेतले. त्या वेळी ‘बाबांनी असे करायला नको होते’, असे मला वाटले; पण नंतर लक्षात आले, ‘त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे.’

३. पत्नीला साधनेत साहाय्य करणे 

सौ. सुवर्णा माळी

३ अ. आईला मायेच्या विचारांतून बाहेर पडण्यासाठी साहाय्य करणे : बाबांनी माझ्या आईला (सौ. सुवर्णा माळी हिला) साधना आणि सेवा यासाठी कधीच विरोध केला नाही. आईला सेवेची गोडी लागावी, यासाठी त्यांनी तिला प्रवृत्त केले. काही वेळा आई मायेतील गोष्टींमध्ये अडकते. त्या वेळी आईला मायेच्या विचारांतून बाहेर पडण्यासाठी ते तिला म्हणतात, ‘‘मायेतील गोष्टींपेक्षा सेवा आणि ईश्वर शाश्वत आहे, आपल्याला त्या भगवंताकडे जायचे आहे.’’

३ आ. आई रुग्णाईत असतांना तिला नामजपादी उपाय करण्यास साहाय्य करणे : मध्यंतरीच्या कालावधीत आई रुग्णाईत होती. तिला नामजपादी उपाय करायला सांगितले होते. तेव्हा बाबांनी तिला नामजपादी उपाय करण्यास सर्वाेतोपरी साहाय्य केले. नामजपादी उपायांनी आईला ७० – ८० टक्के बरे वाटले.

३ इ. स्वतःचा कसलाही विचार न करता पत्नीला सेवेसाठी सनातनच्या सेवाकेंद्रात पाठवणे : एकदा सद्गुरु स्वाती खाडयेताई बाबांना म्हणाल्या, ‘‘काकूंना (माझ्या आईला) थोडे दिवस सोलापूर सेवाकेंद्रात सेवेला पाठवून द्या.’’ तेव्हा बाबांनी कोणत्याच गोष्टीचा विचार न करता आईला लगेच सेवाकेंद्रात पाठवून दिले आणि ते घरी एकटेच राहिले. आईने सेवाकेंद्रात जायच्या आधी बाबांना ४ – ५ दिवसांसाठी बाजरीच्या भाकर्‍या करून ठेवल्या होत्या. एरव्ही बाबांना स्वयंपाक करता येत नाही; पण या वेळी ते आमटी-भात बनवून जेवले. त्यांनी स्वतःचा विचार न करता सद्गुरु स्वातीताईंनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे आज्ञापालन केले.

४. मुलांना साधनेसाठी प्रोत्साहित करणे

कु. दीपाली माळी

४ अ. मुलांना पूर्ण वेळ साधना करण्यासाठी आश्रमांत पाठवणे : आम्हाला (मी आणि माझा भाऊ किरण, वय २१ वर्षे) आश्रमात राहून साधना करायची होती. त्या वेळी बाबांनी कसलाही विचार न करता आम्हाला पूर्ण वेळ साधना करण्यासाठी अनुमती दिली. ही केवळ आणि केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आहे. त्या वेळी बाबांनी सर्वांना सांगितले, ‘‘ही गुरुदेवांचीच मुले आहेत आणि मी त्यांना त्यांच्याच चरणांशी पाठवत आहे.’’

४ आ. मुलांकडून कसलीच अपेक्षा नसणे : आमची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण आहे, तरी ‘मुलांनी शिकून नोकरी करावी आणि पैसे मिळवावेत’, अशी बाबांनी आमच्याकडून कधीच अपेक्षा केली नाही. काही वेळा आमच्या घरी आर्थिक अडचणी येतात; पण त्यांनी आम्हाला त्याविषयी कधीच काही सांगितले नाही किंवा मला आणि भावाला ‘आश्रमातून घरी या’, असेही सांगितले नाही. ‘परात्पर गुरु डॉक्टरच माझा संसार सांभाळणार आहेत’, अशी बाबांची श्रद्धा आहे.

४ इ. मुले आश्रमातून घरी आल्यावर तत्त्वनिष्ठ राहून त्यांच्याकडून साधना करून घेणे : आम्ही आश्रमातून घरी गेल्यावर ‘आमचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न होतात ना !’ याकडे बाबांचे लक्ष असते. ते आम्हाला ‘आमच्याकडून नामजपादी उपाय पूर्ण झाले का ?’ याविषयी नियमित विचारतात. एखादे वेळी आमच्याकडून नामजपादी उपाय पूर्ण झाले नसतील, तर ते आम्हाला उपाय करण्यास सांगतात. यावरून आम्हाला (मी आणि माझा भाऊ यांना) घरी गेल्यावरही ‘बाबांच्या माध्यमातून प.पू. गुरुदेवांचे आमच्याकडे लक्ष आहे’, असे मला जाणवते.

५. सेवेची तळमळ

५ अ. समाजातील विरोधाला न जुमानता गुरुसेवा करणे : बाबा अर्पण आणण्यासाठी समाजात जायचे. तेव्हा समाजातील काही लोक त्यांना आणि संस्थेच्या विरोधात अपमानास्पद बोलायचे किंवा कधी बोलत नसत; पण बाबांनी त्यांच्याकडे कधीच लक्ष दिले नाही.

५ आ. सद्गुरु स्वाती खाडये यांच्या सत्संगाचा धर्मप्रेमींना लाभ व्हावा, यासाठी तळमळीने प्रयत्न करणे : सद्गुरु स्वातीताईंनी आमच्या गावी (कुमठे, तासगाव) जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी सत्संग घेतला होता. ‘गावातील अधिकाधिक धर्मप्रेमींना सद्गुरु स्वातीताईंच्या सत्संगाचा लाभ व्हावा’, अशी बाबांची तळमळ होती. बाबांनी जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांना भेटून सत्संगाचे महत्त्व सांगितले अन् त्यांना सत्संगाला येण्यास प्रोत्साहित केले. बाबांनी तहान-भूक हरपून प्रसाराची सेवा केली. एका धर्मप्रेमीला सत्संगाला येण्यासाठी अडचण होती. त्या वेळी बाबांनी त्यांची अडचण नेमकेपणाने समजून घेऊन त्यावर उपाय सांगितला. त्यामुळे त्या धर्मप्रेमीला सत्संगाला येता आले.

५ इ. सद्गुरु स्वातीताईंनी सांगितलेल्या सेवेत अडचणी आल्या, तरी सेवा पूर्ण करणे : सद्गुरु स्वातीताईंनी बाबांना एखादी सेवा सांगितली, तर ते ती सेवा अगदी मनापासून करतात. काही वेळा त्यांना सेवा करतांना अनेक अडचणी येतात. त्या स्थितीतही ‘ती सेवा वेळेत कशी पूर्ण करू शकतो ?’ याकडे त्यांचा कल असतो. एकदा सद्गुरु स्वातीताईंनी सांगितले, ‘‘सोलापूर सेवाकेंद्रात भाजी हवी आहे, तर अर्पण स्वरूपात मिळवून भाजी मिळवता येते बघा.’’ बाबांनी प्रथम परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करून सेवेला आरंभ केला. तेव्हा त्यांना पुष्कळशा भाज्या अर्पण स्वरूपात मिळाल्या.

६. व्यष्टी साधना आणि नामजपादी उपायाचे गांभीर्य असणे 

सद्गुरु स्वातीताई तासगावला आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी नवीन धर्मप्रेमी आणि साधक यांचा एक सत्संग घेतला होता. त्या ‘सत्संगात व्यष्टी साधनेचे प्रयत्न कसे करायला हवेत ?’, हा विषय सांगितला. त्या वेळी सद्गुरु ताई म्हणाल्या, ‘‘सर्वांनी नामजपादी उपायांना महत्त्व द्यायला हवे आणि नामजप करतांना सामूहिकरित्या केला, तर त्याचा अधिक लाभ होईल. ‘नामजपादी उपाय नियमित कसे पूर्ण होतील ?’ याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.’’ तेव्हापासून बाबा नियमित २ घंटे नामजप पूर्ण करतात. काही वेळा त्यांना त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेल्यावर येण्यास विलंब होतो. घरी आल्यावर ते त्यांचे राहिलेले उपाय पूर्ण केल्याविना महाप्रसाद ग्रहण करत नाहीत.

७. भाव

७ अ. ‘सद्गुरु स्वातीताई म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत’, असा त्यांचा भाव असतो.

७ आ. सद्गुरु (कु.) स्वातीताई घरी येणार असे समजल्यावर पुष्कळ आनंद होणे आणि भावपूर्ण सिद्धता करणे : नोव्हेंबर २०१९ मध्ये ‘सद्गुरु स्वातीताई आमच्या घरी येणार आहेत’, हे बाबांना समजल्यावर त्यांना पुष्कळ आनंद झाला. त्यांनी त्यांची व्यावहारिक कामे बाजूला ठेवून सेवेला प्राधान्य दिले. त्यांनी घरातील सिद्धता पुष्कळ भावपूर्ण केली. त्यांच्या प्रत्येक कृतीतून सद्गुरु ताईंप्रती भाव दिसून येत होता.

७ इ. मित्रांनी साधनेला विरोध केल्यावरही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा ठेवून साधना करणे : बाबा घरी नियमित ‘परात्पर गुरु डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाचे आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राचे पूजन करतात. काही वेळा बाबांचे मित्र घरी आल्यावर ते बाबांना छायाचित्राविषयी विचारायचे. तेव्हा बाबा त्यांना ‘आपले संस्थेचे कार्य समजावून सांगत.’ ते त्यांच्या मित्रांना पटत नसे. त्या वेळी हे सर्व करण्यासाठी त्यांच्या मित्रांनी त्यांना पुष्कळ विरोधही केला; परंतु बाबांनी त्यांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष दिले नाही. ‘गुरुदेवच सर्वकाही पहाणारे आहेत. तेच आमची काळजी घेणार आहेत’ यावर त्यांची नितांत श्रद्धा आहे.

७ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवून भावस्थितीत रहाणे : सप्टेंबर २०२१ मध्ये बाबांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आमच्या घरी वास्तव्यास आले आहेत’, असे जाणवत होते. त्यानंतर २ दिवसांनी त्यांना पांढरा शुभ्र सदरा परिधान केलेले प.पू. गुरुदेवांचे सूक्ष्मातून दर्शन झाले. प.पू. गुरुदेव बाबांना म्हणाले, ‘चला आता, मी येतो.’ असे म्हणून ते ‘बॅग’ हातात घेऊन जात असलेले बाबांना दिसले. त्याबद्दल बाबांना पुष्कळ कृतज्ञता वाटून त्यांचा भाव दाटून आला. मला ही अनुभूती सांगत असतांना बाबा म्हणाले, ‘‘प.पू. गुरुदेवांनी सांगितले, ही मोह-माया सोडून तुम्हाला ईश्वराकडे जायचे आहे.’’

७ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा ठेवून शेतातील कामे एकट्याने पूर्ण करणे : मार्च २०२२ मध्ये आई सेवेसाठी कोल्हापूर सेवाकेंद्रात गेली होती. त्या वेळी आमच्या शेतातील कडधान्ये काढायला झाली हाती. बाबा शेतातील कामे एकटेच करत होते. मी बाबांना भ्रमणभाष करून म्हणाले, ‘‘तुम्हाला एकट्याला शेतीतील सर्व कामे होणार आहेत का ?’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘ते शेत प.पू. गुरुदेवांचे आहे. तेच सर्व करवून घेणार आहेत. मी कुठे काय करणार आहे ?’’

८. जाणवलेले पालट 

८ अ. मित्रांशी अनावश्यक बोलण्यात वेळ न घालवणे : बाबा पूर्वी व्यवहारात पुष्कळ गुरफटलेले असायचे. आमची द्राक्षांची बाग आहे. त्यासंबंधी लोकांना संपर्क करण्यात त्यांचा पुष्कळ वेळ जायचा, तसेच मित्रांशी अनावश्यक बोलणे, त्यांच्याशी गप्पा मारणे आणि अनावश्यक गोष्टींवर चर्चा करणे, यांत ते पुष्कळ वेळ घालवत असत. आता त्यांनी साधना गांभीर्याने करायला चालू केल्यावर ते व्यावहारिक गोष्टींसाठी आवश्यक तेवढाच वेळ देतात. मित्र भेटल्यावर त्यांच्याशी साधनेविषयीच बोलतात. अनेक मित्रांना बाबांनी साधना केलली आवडत नाही. त्यांचे मित्र साधनेच्या विरोधात आणि अपमानास्पद बोलतात, तरीही बाबांचे मन साधनेच्या ध्येयापासून विचलित होत नाही. ते आम्हाला म्हणतात, ‘‘देवाला सर्व ठाऊक आहे. तो सर्व पहातो आहे.’’

८ आ. स्वभाव शांत होणे : बाबांना पूर्वी राग यायचा आणि त्यांना इतरांकडून पुष्कळ अपेक्षा असायच्या; पण ते साधनेत आल्यापासून त्यांच्यामध्ये ७० – ८० टक्के चांगला पालट झाला आहे. आता त्यांचा स्वभाव शांत झाला आहे आणि अपेक्षाही उणावल्या आहेत.

सेवेची तळमळ, उत्तम निर्णयक्षमता, गुरुदेवांप्रती भाव इत्यादी गुण असलेले आणि मला साधनेत साहाय्य करणारे बाबा मिळाले, त्याबद्दल मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते. ‘हे गुरुमाऊली, बाबांचे गुण माझ्यामध्ये आणण्यासाठी तुम्हीच माझ्याकडून तुम्हाला अपेक्षित अशी साधना करवून घ्या, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.’

– कु. दीपाली माळी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.३.२०२२)


कुटुंबियांचा साधनेला विरोध असूनही गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून साधनारत रहाणारे श्री. राजेंद्र माळी आणि त्यांच्या पत्नी सौ. सुवर्णा माळी !

श्री. किरण माळी

१. साधनेला आरंभ केल्यावर साधकाचा आध्यात्मिक त्रास उणावणे

‘वर्ष २०१७ च्या गुरुपौर्णिमेपासून मी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यास आरंभ केला. साधनेला आरंभ करताच माझा आध्यात्मिक त्रास उणावून मला चांगले वाटू लागले. माझ्यातील हा पालट पाहून माझ्या पत्नीनेही (सौ. सुवर्णा माळी हिने) साधना करणे चालू केले.

२. गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून सेवेला आरंभ करणे

साधनेला आरंभ केल्यापासून गुरुदेवच आमचा प्रपंच चालवत आहेत. ‘काहीही झाले, तरी आपण गुरुदेवांचे चरण सोडायचे नाहीत’, असे आम्ही ठरवले आणि दोघांनी सेवा चालू केली.

३. कुटुंबियांनी साधनेला विरोध करूनही ‘गुरुदेवच आपले आई-वडील आणि सर्वस्व आहेत’, अशी दृढ श्रद्धा ठेवून सेवारत रहाणे

माझी मुलगी कु. दीपाली माळी (वय २२ वर्षे) ही देवद आश्रमात आणि मुलगा श्री. किरण माळी (वय २१ वर्षे) हा रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहे. मुलांना सेवेसाठी आश्रमांत पाठवल्यानंतर माझे सासू-सासरे, चुलत भाऊ इत्यादी आम्हाला ‘तुम्ही हे काय करत आहात ? तुम्ही मुलांना घरी बोलवा आणि मुलीचे लग्न करून द्या ?’, असे म्हणू लागले. ते आम्हाला साधना करण्यास विरोध करू लागले. तेव्हा आम्ही गुरुदेवांवर पूर्ण श्रद्धा ठेवली आणि सेवा करू लागलो. ‘गुरुदेवच आपले आई-वडील आणि सर्वस्व आहेत’, असे मी आणि माझ्या पत्नीने मनाशी पक्के ठरवले.

४. ‘गुरुदेव मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात’, याची अनुभूती येणे

कधी कुठल्या कामाच्या संदर्भात विचार जरी आला, तरी ते काम लगेच होऊन जाते. माझ्या सर्व इच्छा गुरुदेव पूर्ण करतात. मी काही न मागताच ते मला सर्वकाही देतात. आम्ही घरी गुरुदेवांची आरती करतो. त्या वेळी ‘गुरुदेव सूक्ष्मातून आमच्या घरी येऊन आम्हाला चैतन्य देतात आणि मनातील सर्व इच्छा लगेचच पूर्ण करतात’, असे मला वाटते.

५. कृतज्ञता

गुरुदेवांमुळे आमच्या जीवनाचे सार्थक झाले. त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. राजेंद्र माळी, सांगली (१२.६.२०२२)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक