गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची माहिती
पणजी – गोवा राज्यात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’पासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तींच्या विक्रीवर बंदी असली, तरीही शेजारील राज्यांतून मोठ्या प्रमाणात अशा मूर्तींची आवक होत आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या २ वर्षांत यावर कारवाई करता आली नाही. यावर्षी कोरोनाचा प्रभाव अल्प झाल्याने मंडळाचे निरीक्षक कारवाई करणार आहेत. कला आणि संस्कृती खात्यात नोंद असलेल्या श्री गणेश मूर्तीकारांच्या चित्रशाळेत जाऊन तेथे ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीची विक्री होत आहे का ? याचे अन्वेषण करणार आहेत. सध्या ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्तींची विक्री करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून यासाठी कारावासही भोगावा लागू शकतो, अशी माहिती गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली आहे.
पर्यावरणपूरक मूर्ती आणून श्री गणेशचतुर्थी साजरी करावी ! – पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल
गेल्या वर्षापासून ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली असून दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश संबंधित अधिकार्यांना दिला आहे. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींची विक्री केल्यास सुमारे ५० सहस्र रुपये दंड आहे. लोकांनी पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती आणून श्री गणेशचतुर्थी साजरी करावी.