१. आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती
अ. ‘आश्रमात आल्यावर माझ्या पोटात गोळा आल्यासारखे आणि शरिरातून विद्युत् प्रवाह गेल्यासारखे जाणवले. अशी अनुभूती मला कुलदेवीला (श्री महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर येथे) गेल्यावरही आली होती.
आ. आश्रमात आल्यावर ‘पुष्कळ वर्षांनी माझ्या घरी आलो आहे’, असे मी अनुभवले.
२. सायंकाळी आश्रम पहातांना आश्रम दाखवणार्या साधिका ‘साक्षात् नारदमुनी आहेत’, असे मला जाणवले. (नारदमुनी वैकुंठाची वैशिष्ट्ये सांगतांना विष्णुभेटीची ओढ लावत असत.)
३. ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना आलेल्या अनुभूती
अ. आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना मला पाण्यात तरंगत असल्यासारखे मला वाटले आणि माझे मन चैतन्याने भारित होऊन मला माझे शरीर हलके जाणवत होते.
आ. एकाग्रतेने नामजप करतांना ध्यानमंदिरातील श्री दुर्गामातेच्या मूर्तीकडे पाहिल्यावर शरिरात कंपने जाणवत होती. मातेच्या सिंहाचे रौद्ररूप पाहून ‘माझ्यावरील त्रासदायक आवरण नष्ट होत आहे’, असे मला जाणवले.
४. आश्रमातील खोलीच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
अ. मी इतर वेळी रात्री ९ वाजता झोपतो आणि उशिरा झोपल्यास मला हाक मारूनही जाग येत नाही; पण आश्रमातील निवासस्थानी मला शांत झोप लागली आणि उशिरा झोपूनही सकाळी ५ वाजता कुणीही न उठवता मला जाग येत होती.
आ. माझ्या समवेत खोलीत रहाणारे इतर साधक जेव्हा खोलीत येतात, तेव्हा ‘खोलीचा भावही पालटतो’, असे मला जाणवले. पहिल्या दिवशी मी एकटा होतो. तेव्हा मला खोलीने ‘ये बाळा’, असे म्हटल्याचे जाणवले. नंतर इतर युवा साधक खोलीत आल्यावर खोली ‘या बाळांनो’, असे म्हणाल्याची मला जाणीव झाली.
५. शरिरावर दैवी कण दिसणे
अ. सेवा करतांना नामजप केल्यावर माझे मन कृष्णभावात मुग्ध झाले होते. नंतर काही वेळाने मला माझ्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर मोरपिशी रंगाचा दैवी कण सापडला.
आ. आश्रम पहातांना एका काकूंनी ‘सूक्ष्म-जगताच्या परिणामांच्या अद्वितीय संग्रहालया’तील आरशाविषयी अनुभूती सांगितल्यावर माझ्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर सोनेरी रंगाचा दैवी कण सापडला.
इ. महाप्रसादाच्या वेळी माझ्या नाकाच्या डाव्या बाजूला मोठा चंदेरी कण असल्याचे एका साधिकेच्या लक्षात आले.
६. अन्य अनुभूती
अ. एकदा अनिष्ट शक्तींच्या सूक्ष्म आक्रमणामुळे मला सकाळी जाग आली नाही. त्यामुळे इतर साधकांच्या नियोजनात पालट झाला. तेव्हा अनिष्ट शक्तींना न घाबरता प्रार्थना केल्यावर ‘ही भगवंताने दिलेली अनुभूती आहे आणि गुरुदेव कठीण प्रसंगात आपल्याला शिकण्याची संधी देत आहेत’, असे मला जाणवले.
आ. मला स्वप्नात तुळशी वृंदावन आणि उदबत्त्या ही शुभचिन्हे दिसली.
इ. रात्री झोपतांना ‘मी श्रीगुरूंचे पाय चेपत आहे’, असा भाव मी प्रयत्न न करताही अनुभवला. मी मानसरित्या परात्पर गुरु डॉक्टरांचे पाय आणि डोके चेपत असतांना माझे पाय अन् डोके यांनाही आराम मिळाल्याचे मला जाणवले.
७. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याविषयी आलेल्या अनुभूती
७ अ. त्रासदायक अनुभूती
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ साधना शिबिराच्या ठिकाणी येण्याआधी भावजागृतीचा प्रयोग घेण्यात आला होता. तेव्हा मी डोळे मिटल्यावर माझ्या डोळ्यांपुढे केरकचरा आणि घाण दिसत होती. हे अनिष्ट शक्तीचे आक्रमण असल्याचे माझ्या लक्षात आले.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई सभागृहात आल्यावर त्यांनी सामूहिक प्रार्थना घेतली. तेव्हा मला डोळे मिटायची भीती वाटत होती. त्या वेळी ‘मला त्रास देणारी अनिष्ट शक्ती बळावत आहे’, असे मला वाटत होते. मी डोळे मिटल्यावर मला किडे आणि अळ्या दिसल्या अन् मी पुष्कळ खचून गेलो. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्याकडून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचा लाभ होऊ नये, यासाठी अनिष्ट शक्तींनी मला हे दृश्य दाखवल्याने मला भीती वाटली.
७ आ. चांगल्या अनुभूती
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्याशी बोलत असतांना मला बालकभाव अनुभवता आला. तेव्हा मला अतिशय शांत वाटत होते. मला अनिष्ट शक्तींची वाटणारी भीती पूर्णपणे गेली होती आणि माझ्या चेहर्यावर हास्य उमटले होते. मला प्रसन्न वाटत होते.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी भाववृद्धीचा प्रयोग घेतांना ‘कुणाला सुगंध आला का ?’, असे विचारले. तेव्हा माझ्या अंगावर रोमांच आले.’
– कु. दिव्यांक हिरेकर (वय २० वर्षे), नेरूळ, नवी मुंबई. (१८.११.२०२१)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्या या कणांचे ‘भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे ‘फॉर्म्युले’ सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात. |