बंगालमध्ये सेवारत असतांना एका धर्मप्रेमीने अनुभवलेली ईश्वराची कृपा !

१. आरंभी रमजानच्या काळात अनेक वेळा दिल्या जाणार्‍या अजानमुळे त्रास होऊन मनात प्रतिक्रिया येणे

‘बंगालमध्ये रज-तम मोठ्या प्रमाणात आहे. मी जेथे निवासाला असतो, तेथे आजूबाजूला ७ – ८ छोट्या-मोठ्या मशिदी आहेत. बंगालमध्ये मुसलमान समुदायाला भोंग्यावरून अजान देण्यावर कोणतेही बंधन नाही. रात्री १ – २ वाजताही ते काही सूचना असतील, तर मोठ्या आवाजात अजान देतात. पहाटे ४ – ४.३० च्या कालावधीत पहिली अजान दिली जाते.

रमजानच्या काळात ५ पेक्षाही अधिक वेळा अजान दिली जाते. एकदा अजान देणे चालू झाले की, सगळ्या मशिदींतून वेगवेगळ्या वेळी अजान चालू केल्याने ४ – ५ मिनिटे मोठा कोलाहल होतो. आरंभी मला या आवाजाचा पुष्कळ त्रास होत असे, तेव्हा मी प्रार्थना करून शांत रहाण्याचा प्रयत्न करत असे.

२. ९ मासांनंतर स्वतःत पालट झाल्याचे जाणवणे आणि अजानमुळे मनावर कोणताही परिणाम न होणे

कोरोना महामारीमुळे लागू झालेल्या पहिल्या दळणवळण बंदीच्या वेळी मी ९ मास कोलकाता येथेच होतो. त्यानंतर मार्च २०२२ नंतर मी सेवेसाठी परत कोलकाता येथे गेलो. तेव्हा मला माझ्यात एक पालट अनुभवता आला. ‘अजानमुळे होणार्‍या आवाजाचा माझ्या मनावर काहीच परिणाम होत नसून त्या वेळी आपोआप माझ्याकडून प्रार्थना होते’, असे मला अनुभवता आले. ‘मला हे केवळ ईश्वराच्या कृपेनेच अनुभवता आले’, याबद्दल मी त्याच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

३. बंगालमध्ये रज-तम अधिक असूनही साधनेमुळे ईश्वराचे अस्तित्व सतत जाणवणे

बंगालमधील वातावरणात रज-तम अधिक असल्याने साधक मला विचारतात, ‘‘तुम्ही तिथे साधना कशी करता ?’’ तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘मी बंगालमध्ये असतो, तेव्हा तुलनेत माझी साधना अधिक चांगली होते; कारण ईश्वराचे माझ्या समवेतचे अस्तित्व अधिक प्रमाणात कार्यरत असते. मला हे ईश्वराच्या कृपेनेच अनुभवता आले.’

– एक धर्मप्रेमी, कोलकाता, बंगाल. (२८.६.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार धर्मप्रेमीच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक