गोवा : बायणा, वास्को येथे जखमांनी भरलेल्या अवस्थेत गायीचा मृतदेह सापडल्याने नागरिकांमध्ये संताप

(प्रतिकात्मक चित्र)

वास्को, २८ जुलै (वार्ता.) – बायणा, वास्को येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाशेजारी एका गायीचा जखमांनी भरलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आहे. ही गाय गाभण होती आणि काही अज्ञात इसमांनी शस्त्राने भोसकून तिला ठार केले असल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. या घटनेविषयी माहिती मिळताच अनेक प्राणीमित्रांनी या घटनेविषयी संताप व्यक्त केला आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार ही गाय रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि तिच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या. ‘या गायीची हत्या करणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी अनेक स्थानिक नागरिकांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी मोकाट गुरांवर गरम पाणी ओतल्याची घटना वास्कोमध्ये घडली होती. याविषयी आमदार कृष्णा साळकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘यावर पोलीस कारवाई करतील’, असे आश्वासन दिले होते.