पोलिसांची निवासस्थाने दुर्लक्षित !

नोंद 

राज्यातील पोलीस, एस्.टी. आणि प्रशासकीय कर्मचारी यांच्या घरांचा प्रश्न अनेकदा चर्चिला जातो; मात्र प्रत्यक्षात नवीन घरे देण्याविषयीची समस्या अजूनही न सुटल्याने त्यांना जुन्या, पडक्या आणि असुविधा असलेल्या घरात किंवा भाड्याने घर घेऊन रहावे लागते. याविषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘राज्यात मोठ्या प्रमाणात पोलीस घरापासून वंचित आहेत. त्यांना घरे मिळवून देण्यासाठी, तसेच इतर शहरांतील पोलीस गृहनिर्माणासाठी आरक्षित भूखंडावरील प्रकल्प विकसित करून त्याबदल्यात घरे उपलब्ध करून घेता येतील. पोलीस गृहनिर्माण योजनेसाठी निधी अल्प पडू देणार नाही.’’ मुख्यमंत्र्यांचे हे आश्वासन समस्या सुटण्याच्या दृष्टीने आशादायी आहे. आव्हानात्मक परिस्थितीत सातत्याने कर्तव्यावर असणार्‍या पोलिसांना स्वतःच्या हक्काचे घर, तसेच शासकीय निवासस्थान उपलब्ध करून देण्याचा निर्धार शासनाने केला आहे. आतापर्यंतही शासनकर्त्यांनी असा निर्धार केला होता; पण प्रत्यक्षात तो कागदावरच राहिला. त्यामुळे पोलीस आणि शासकीय कर्मचारी घरांपासून वंचित राहिले.

खरेतर पोलीस आणि शासकीय कर्मचारी यांच्या घरातील असुविधा पाहिल्यास त्यांचे वर्णन करण्यासाठी शब्दच नाहीत. वेळेवर पाणी नसणे, गंजलेल्या जलवाहिन्या, खड्डे पडलेले रस्ते, जलनिःस्सारणाची योग्य व्यवस्था नसणे, पावसाळ्यात छपरातून गळणारे पाणी, पडक्या भिंती अशा अनेक समस्यांना तोंड देत ७० वर्षांपासून हे कर्मचारी अशा घरांत रहात आहेत. राज्यात काही मोजक्याच ठिकाणी शासकीय निवासस्थाने चांगली आहेत. देशाअंतर्गत सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर रहाणार्‍या पोलीसदलाविषयीच्या निवार्‍याकडे दुर्लक्ष होणे हे गंभीर आणि संतापजनक आहे.

अर्थसंकल्पात शासकीय कर्मचार्‍यांना घरे देण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते; पण प्रत्यक्षात कार्यवाही होत नाही. याच्या मुळाशी जायला हवे. कर्मचार्‍यांना घरे मिळावीत, यासाठी अनेक प्रकल्प चालू केले जातात; परंतु ते पूर्णत्वाला जाऊन कर्मचार्‍यांना सुविधा मिळाल्या आहेत, याकडे पाहिले जात नाही. मुख्यमंत्र्यांनी प्रारंभीच हा विषय सोडवण्याच्या दृष्टीने यामध्ये लक्ष घातल्यामुळे ‘दुर्लक्षित घरांची समस्या सुटेल’, असे वाटते. हिंदु राष्ट्रात राष्ट्रासाठी सदैव झटणारे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी उत्तम दर्जाची शासकीय निवासस्थाने दिली जातील, हे नक्की !

– श्री. सचिन कौलकर, मुंबई.