कुणाकडूनही अपेक्षा न ठेवता अखंड कृतज्ञताभावात रहाणार्‍या (कै.) सौ. शालिनी मराठे (वय ७४ वर्षे) !

(कै.) सौ. शालिनी मराठे

१. अपेक्षा नसणे

‘फेब्रुवारी २०२२ मध्ये सौ. शालिनी मराठे रुग्णालयातून आल्यानंतर मी त्यांना भेटायला गेल्यावर आम्ही बराच वेळ बोललो. तेव्हा त्यांनी स्वतःची स्थितीही सांगितली. निघतांना त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही प्रतिदिन आलात, तरी मला आवडेल; पण तुम्ही सेवा करा. मी आनंदात आहे. त्यामुळे मला भेटायला नाही आलात, तरी चालेल.’’ साधारणपणे आजारी व्यक्तीची सतत ‘कुणी तरी अवतीभोवती असावे’, अशी मानसिकता असते; पण काकू सर्वच साधकांच्या संदर्भात असाच विचार करायच्या. ‘साधकांनी काकूंसाठी वेळ न देता आपली नियोजित सेवा करावी’, हा त्यांचा विचार ‘त्या नेहमी गुरुदेवांना अपेक्षित वागतात’, हे दर्शवणारा होता.

२. स्थिरता

जून २०२२ मध्ये त्या रुग्णालयातून परत आल्यावर एका साधिकेने मला सांगितले, ‘‘त्या तुमची चौकशी करत होत्या.’’ त्यामुळे मी त्यांना भेटायला गेले. तेव्हा त्यांना अनिवार झोप येत असूनही आणि त्यांची स्थिती गंभीर असूनही त्या माझ्याशी बोलल्या. स्वतःच्या स्थितीविषयी सांगून त्या म्हणाल्या, ‘‘हे शेपूट किती काळ असेल, माहीत नाही.’’ (किती काळ हे सहन करावे लागणार आहे, ठाऊक नाही.) बसला नाहीत, तरी चालेल; पण मध्ये मध्ये थोडा वेळ उभ्या उभ्या येत जा.’’ तेव्हा ‘त्यांना स्वतःच्या आजाराची पूर्ण कल्पना आहे आणि तरीही त्या स्थिर आहेत’, हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे मी त्यांना प्रतिदिन भेटण्याचा प्रयत्न करायचे.

पूर्वी त्यांना ‘दिवसभरात थोडा वेळ तरी मराठेकाकांना भेटावे’, असे वाटायचे. त्यांना त्यांचा आधार वाटायचा; पण ‘सध्या ते माझ्या जवळ नाहीत, हे चांगले आहे. त्यांना उगाच हे पहायला नको’, असे म्हणायच्या. इतक्या गंभीर आजारातही त्यांचे स्थिर रहाणे त्यांची साधनेतील प्रगती दर्शवते.

३. सतत कृतज्ञताभावात रहाणार्‍या सौ. शालिनी मराठे !

अ. त्यांचे आजारपण वाढले, तसे मराठेकाका सौ. शालिनी यांना आराम वाटावा; म्हणून थोडे साहाय्य करायचे. तेव्हा त्यांना त्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटायची. त्या डोळ्यांत पाणी आणून सांगायच्या, ‘‘आपल्याला नवर्‍याकडून कामे करून घ्यायची सवय नाही ना !’’

आ. सर्व साधक त्यांची काळजी घ्यायचे याविषयीही त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटायची. इथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच सर्व साधक माझी काळजी घेत आहेत.’’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पहिल्यापासून साधकांवर आजारी, वयोवृद्ध आणि आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांची काळजी घेण्याचे संस्कार करून त्यांना घडवले. त्यामुळे साधकांना इतक्या गंभीर स्थितीतही त्यांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) आणि आश्रमाचा आधार वाटतो. आश्रमात कोणाचे नातेवाईक असोत किंवा नसोत, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळे साधक त्यांची काळजी घेतात, याची सर्वांना निश्चिती असते. आश्रमात अनेक साधकांचे आजारपण असते. काही जणांचा मृत्यूही होतो; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शिकवणीमुळे साधकांना ताण आला आहे, ते दुःखी आहेत, कुणी मृत्यू पावल्याने ते घाबरले आहेत किंवा या परिस्थितीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेत, असे दिसत नाही. सर्वांना आश्रमात रहाण्यात धन्यता वाटते.’

– सौ. छाया विवेक नाफडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.७.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक