प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी !

महाराष्ट्र हे एकदा वापरण्याच्या प्लास्टिकवर बंदी घालणारे देशातील पहिले राज्य !

मुंबई – केंद्र शासनाने १ जुलै २०२२ पासून ‘सिंगल यूज’ (एकदा वापरायच्या) प्लास्टिकवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने प्लास्टिक लेपीत (कोटिंग) आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र हे एकदा वापरण्याच्या  प्लास्टिकवर बंदी घालणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

राज्यात प्लास्टिकबंदीच्या प्रभावी कार्यवाहीसाठी एक समिती नेमण्यात आली होती. समितीने ७ जुलै २०२२ या दिवशीच्या बैठकीत महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकॉल उत्पादने अधिसूचना २०१८ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्य शासनाने १५ जुलै २०२२ या दिवशीच्या अधिसूचनेद्वारे प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी घातली आहे. या वस्तूंमध्ये वापरण्यात आलेले प्लास्टिक निकृष्ट दर्जाचे असून विघटनास घातक ठरत आहे. दैनंदिन कचर्‍यातील अशा प्रकारच्या प्लास्टिकचा कचरा अल्प करणे हा या बंदीचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार आता राज्यात प्लास्टिक लेपीत (कोटिंग), तसेच प्लास्टिकचा थर असणार्‍या पेपर किंवा ॲल्युमिनियम इत्यादींपासून सिद्ध केलेल ‘डिश’, ‘कप’, ‘प्लेट्स’, ‘ग्लास’, वाडगे, ‘कंटेनर’ या उत्पादनांवर बंदी असणार आहे.