बेळ्ळारे (कर्नाटक) येथे भाजपच्या नेत्याची निर्घृण हत्या !

जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ आणि ‘सोशल डेमॉक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया’ यांच्यावर संशय !

भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव प्रवीण नेट्टारू

बेळ्ळारे (कर्नाटक) – कर्नाटक राज्याच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेळ्ळारे येथे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव प्रवीण नेट्टारू यांची अज्ञातांनी कुर्‍हाड आणि तलवार यांद्वारे गळ्यावर वार करून हत्या केली. या हत्येमागे जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे जिहादी कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे. प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येच्या निषेधार्थ भाजपचे अनेक कार्यकर्ते रात्री रस्त्यावर आंदोलनासाठी बसले होते. या हत्येच्या प्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘आम्हाला न्याय हवा’, अशा घोषणा दिल्या. विश्‍व हिंदु परिषदेने दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेळ्ळारे, पुत्तूरू, सुळ्या आणि कडाबा येथे बंदचे आवाहन केले होते. हत्येच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी तीव्र शोक व्यक्त केला. ‘दक्षिण कन्नड जिल्ह्यातील आमच्या पक्षाचे कार्यकर्ते प्रवीण नेट्टारू यांची निर्घृण हत्या निषेधार्ह आहे. असे घृणास्पद कृत्य करणार्‍यांना लवकरच अटक करून कायद्यानुसार शिक्षा केली जाईल. प्रवीण यांच्या आत्म्यास शांती लाभो. ईश्‍वर त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो’, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

१. २६ जुलैच्या रात्री नेट्टारू त्यांचे दुकान बंद करत होते. त्याच वेळी दुचाकी गाडीवरून आलेल्या अज्ञात मारेकर्‍यांनी त्यांच्यावर वार केले. यात नेट्टारू गंभीररित्या घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात येत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

२. प्रवीण नेट्टारू यांचे पार्थिव मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्यांच्या सुळ्या येथील घरी नेण्यात आले. त्यानंतर तेथून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

३. माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या काही वृत्तांनुसार पोलिसांना संशय आहे की, प्रवीण यांची हत्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफ्आय) आणि सोशल डेमॉक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय.) यांनी केल्याचा संशय आहे. ही हत्या काही दिवसांपूर्वी बेळ्ळारे येथे मुसलमान तरुण मसूद याच्या हत्येचा सूड उगवण्यासाठी केल्याचा संशय आहे. पोलिसांनी अन्वेषणासाठी ५ विशेष पथकांची स्थापना केली आहे. राज्यातील पोलिसांची पथके मडिकेरी आणि हासन येथे, तर एक पथक केरळमध्ये गेले आहे.

४. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, प्राथमिक अहवालानुसार आणि काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार पी.एफ्.आय. आणि एस्.डी.पी.आय. यांच्याकडे बोट दाखवले जात आहे. या संघटनांना केरळमध्ये साम्यवादी, तर कर्नाटकमध्ये काँग्रेस प्रोत्साहित करत आहे. राज्यातील आमचे सरकार कारवाई करील आणि दोषींना शिक्षा देईल.

कन्हैयालाल यांचे केले होते समर्थन !

उदयपूर येथील शिंपी कन्हैयालाल यांची धर्मांधांनी केलेल्या हत्येच्या विरोधात प्रवीण नेट्टारू यांनी २९ जून या दिवशी सामाजिक माध्यमांतून एक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी एक छायाचित्रही शेअर केले होते. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की, केवळ राष्ट्रवादी विचारसरणीचे समर्थन केल्यामुळे एका शिंप्याचा शिरच्छेद करून त्यांची हत्या करण्यात आली आणि त्या घटनेचा व्हिडिओ बनवण्यात आला.

संपादकीय भूमिका

  • ‘ही हत्या धर्मांधांनी केली असणार’, यात कुणालाच शंका वाटत नाही. धर्मांधांनी नूपुर शर्मा यांच्या प्रकरणानंतर देशात हिंदूंच्या विरोधात धर्मयुद्ध पुकारले आहे, हे अशा प्रकारच्या मागील काही घटनांतून लक्षात येत आहे. या प्रकरणी आता केंद्र सरकारने कठोर पावले उचलून यामागील शक्तींवर कठोर कारवाई करावी !
  • एका अखलाक नावाच्या मुसलमानाची जमावाकडून हत्या झाल्यावर देशभर आकांडतांडव करणारे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी राजकीय पक्ष आणि संघटना अशा घटनांच्याविषयी मात्र सोयीस्कर मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !
  • ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ आणि ‘सोशल डेमॉक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया’ यांचे नाव अनेक देशविरोधी कारवायांमध्ये आतापर्यंत समोर आले असतांनाही तिच्यावर बंदी न घातली जाणे, ही हिंदूंसाठी आश्‍चर्याचीच गोष्ट आहे !