दीप अमावास्येच्या दिवशी केलेल्या दीपपूजनाचे आध्यात्मिक महत्त्व !

आज असलेल्या आषाढ अमावास्या म्हणजेच दीप अमावास्येच्या निमित्ताने…

‘आषाढी अमावास्येला दीपपूजन केले जाते. आज २८.७.२०२२ या दिवशी दीपपूजन आहे. ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांना दीपपूजनाविषयीचे मिळालेले ईश्वरी ज्ञान आणि आलेली अनुभूती येथे देत आहोत.

दीपपूजन

१. दीपपूजन केल्यामुळे होणारे आध्यात्मिक स्तरावरील लाभ

कु. मधुरा भोसले

१ अ. आषाढी अमावास्येला दीपपूजन केल्यामुळे दिव्याला तेजतत्त्वयुक्त सात्त्विकता आणि चैतन्य मिळून अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांपासून त्याचे रक्षण होणे : चातुर्मासात देव झोपले असल्याने (क्रियाविरहित झाल्याने) वायूमंडलात रज-तम लहरींचे प्रमाण आणि अनिष्ट शक्तींचे प्राबल्य वाढलेले असते. तसेच पावसाळी आणि ढगाळ वातावरणामुळे पृथ्वीवर सूर्यप्रकाशाचे प्रमाण अल्प असते. अशा प्रकारे चातुर्मासात सात्त्विकता, चैतन्य आणि तेजतत्त्व यांचा अभाव जाणवतो. इतर तिथींच्या तुलनेत पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना अनिष्ट शक्तींचे बळ वाढून त्या विविध सात्त्विक घटकांवर सूक्ष्मातून अधिक प्रमाणात आक्रमणे करतात. चातुर्मासातील आषाढी अमावास्येलाही अनिष्ट शक्तींचे आक्रमण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे आषाढी अमावास्येला दीपपूजन करण्याचे विशेष महत्त्व आहे. या पूजनाने दिव्याला तेजतत्त्वयुक्त सात्त्विकता आणि चैतन्य मिळून त्याचे अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होते.

१ आ. वायूमंडलातील रज-तम लहरी आणि त्रासदायक शक्ती यांमुळे दिव्याभोवती आलेले सूक्ष्म आवरण दीपपूजनाने नष्ट होणे : दिव्याभोवतीच्या वायूमंडलात कार्यरत असणार्‍या रज-तम लहरींचे आणि त्रासदायक शक्तीचे दिव्याभोवती आलेले सूक्ष्म आवरण दीपपूजनाने नष्ट होते. त्यामुळे दिवा प्रज्वलित केल्यावर त्याच्या ज्योतीचा प्रकाश स्वच्छ, स्पष्ट आणि प्रखर दिसू लागतो. तसेच ज्योतही स्थिर रहाते आणि ती स्पष्ट दिसते. दिव्याच्या ज्योतीला काजळी लागण्याचे प्रमाणही न्यून होते.

१ इ. दिव्यातील देवतत्त्वाचे पूजन झाल्याने त्याच्यातील देवत्व जागृत होऊन ते वर्षभर कार्यरत रहाणे : दिव्यातील देवतत्त्वाचे पूजन झाल्याने त्यातील देवत्व जागृत होऊन ते वर्षभर कार्यरत रहाते. दिव्याला पाहून नमस्कारासाठी हात आपोआप जोडले जाणे, दिव्याला पाहून भाव जागृत होणे, दिव्याचा प्रकाश अधिक तेजस्वी आणि चैतन्यमय झाल्याचे जाणवणे, ही सर्व दिव्यातील देवत्व जागृत झाल्याची लक्षणे अन् अनुभूती आहेत.

१ ई. दिव्याभोवती अग्निनारायणाच्या तेजतत्त्वाचे अभेद्य संरक्षककवच निर्माण होऊन अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांपासून त्याचे वर्षभर रक्षण होणे : दिव्याच्या पूजनाने त्याला अग्निनारायणाचे लक्षांश तेज ग्रहण होऊन ऊर्जा पुन्हा प्राप्त होते. या ऊर्जेच्या बळावर दिव्याची साधना (सात्त्विकता) अविरतपणे चालू रहाण्यास साहाय्य होते. अग्निनारायणाच्या तेजाच्या अंशाच्या प्राप्तीमुळे दिव्याभोवती तेजतत्त्वाचे अभेद्य संरक्षककवच निर्माण होऊन त्याचे अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांपासून वर्षभर रक्षण होते.

१ उ. दिव्याच्या पूजनाने दिव्याची अनिष्ट शक्तींशी युद्ध करण्याची क्षमता वाढणे आणि ती वर्षभर टिकून रहाणे : दिव्याच्या पूजनाने त्याला प्राप्त झालेल्या तेजतत्त्वयुक्त अग्निनारायणाच्या संरक्षककवचामुळे दिव्याचे क्षात्रतेज वृद्धींगत होते. त्यामुळे दिव्यावर होणारी अनिष्ट शक्तींची आक्रमणे परतवण्याची आणि अनिष्ट शक्तींशी सूक्ष्म युद्ध करण्याची दिव्याची क्षमता वाढते अन् वर्षभर टिकून रहाते.

१ ऊ. दिव्याच्या पूजनामुळे भक्तरूपी दिवा आणि भगवंत यांचे पूजकाला कृपाशीर्वाद मिळणे : दिवा हा देवाचा सेवकभावातील भक्त आहे. भक्ताचे पूजन केल्याने भक्ताला आनंद होण्यासह भगवंतही प्रसन्न होतो आणि पूजकाला भक्तरूपी दिवा अन् भगवंत यांचे कृपाशीर्वाद मिळून त्यांची साधना चांगली होते.

१ ए. दीपपूजनाने पूजकाची समष्टी साधना होणे : दीपपूजन केल्याने दिव्याच्या साधनेला साहाय्य होत असल्याने दीपपूजनाने पूजकाची समष्टी साधना होते आणि त्याला समष्टी साधनेचे फळ प्राप्त होते.

२. प्रज्वलित केलेल्या दिव्याला स्पर्श केल्याने त्याच्या साधनेत विघ्न उत्पन्न झाल्यामुळे दिवास्पर्श केल्याने पाप लागणे आणि त्यासाठी प्रायश्चित्त घ्यावे लागणे

दिव्याची साधना अखंड चालू असते. त्यामुळे त्याला आपला स्पर्श झाला, तर त्याच्या साधनेत व्यत्यय येतो. तसेच आपल्या स्पर्शातून रज-तमप्रधान लहरी दिव्याकडे प्रक्षेपित झाल्याने त्याच्या भोवती त्रासदायक शक्तीचे आवरण येऊ शकते. त्यामुळे हिंदु धर्मशास्त्रात ‘दिव्याला स्पर्श करणे पाप आहे’, असे सांगितले आहे. दिव्याला जर चुकून स्पर्श झाला, तर लागलेले पाप नष्ट करण्यासाठी स्वच्छ पाण्याने हात धुऊन घ्यावा आणि दिव्यासमोर हात जोडून त्याची कळकळीने क्षमा मागावी. यामुळे पापक्षालन होऊन व्यक्तीला लागलेला दिवास्पर्शाचा दोष नाहीसा होतो. (दीप लावल्यावर त्याला पुन्हा पुन्हा स्पर्श करणे अयोग्य आहे. कोणत्याच विधीत स्पर्श करण्यास सांगितलेले नाही. – एक पुरोहित)

३. दीपपूजन आणि दीपयज्ञ

दीपपूजन करणे, हे व्यष्टी साधनेच्या अंतर्गत येते. अशा अनेक दिव्यांचे पूजन करणे, ही समष्टी साधनेच्या स्तरावरील कृती असल्याने तिला ‘दीपयज्ञ’ म्हणतात. आषाढ मासात (महिन्यात) दीपयज्ञ करण्याचीही प्रथा आहे.

४. अनुभूती

३०.७.२०११ या दिवशी दीप अमावास्या होती. त्या रात्री देवघरात तुपाचा दिवा लावला होता. रात्री १२.३० नंतर स्थुलातून हवा वहात नसतांनाही दिव्याची ज्योत सारखी फडफडत होती. त्यानंतर ‘फट्’ असा आवाज झाल्याने मी उठून दिव्याकडे पाहिले, तेव्हा ‘दिव्याची ज्योत वातावरणातील अनिष्ट शक्तींशी घनघोर सूक्ष्म युद्ध करत आहे’, असे मला जाणवले. स्थुलातून दिव्याच्या ज्योतीतील पिवळा प्रकाश न्यून होऊन केशरी प्रकाश वाढला होता आणि ज्योतीचा आकार पुष्कळ मोठा झाला होता.’

– कु. मधुरा भोसले, श्रावण कृष्ण द्वितीया, कलियुग वर्ष ५११३ (१५.८.२०११, रात्री. ८)

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.