संभाजीनगर येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने सहस्रों हिंदूंचा मूक मोर्चा !

देशातील हिंदूंवरील अत्याचारांचा विरोध !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून काढण्यात आलेला भव्य मोर्चा

संभाजीनगर – देशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार चालू असून त्यांच्या हत्या होत आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी आणि औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांचे नामांतर लवकर करण्याच्या मागणीसाठी २४ जुलै या दिवशी शहरात विविध संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय संघटना यांच्या वतीने भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. पैठण गेट येथून मोर्च्यास प्रारंभ झाला. शहरातील विविध मार्गांवरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. या मोर्च्यात सहस्रों हिंदू आणि काही संत सहभागी झाले होते. देशातील हिंदू आणि हिंदु नेते यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्च्यातील काही हिंदुत्वनिष्ठांनी काळे कपडे परिधान केले होते. मोर्च्याच्या समारोप प्रसंगी औरंगपूर येथे छोट्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपिठावर सर्वप्रथम वेदमंत्रपठण करण्यात आले. त्यानंतर व्यासपिठावर उपस्थित संतांनी सर्वांना मार्गदर्शन केले. मोर्च्याची सांगता पसायदानाने करण्यात आली. राज्यात मुंबई, पनवेल, जळगाव, नांदेड, परभणी आदी ठिकाणी असे मोर्चे काढण्यात आले.

त्यानंतर विश्‍व हिंदु परिषदेचे प्रभारी (एखाद्या विभागाचे दायित्व सांभाळणारे) प्रमुख श्री. आप्पा बारगजे मूक मोर्च्याचा उद्देश सांगतांना म्हणाले की, राज्यघटनेच्या रक्षणार्थ आणि जिहादच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला आहे.

अमरावती येथे उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. अशा अनेक हत्यांचे सत्रच भारतामध्ये चालू झालेे आहे. याद्वारे जो इस्लामी आतंकवाद पसरवण्याचे कार्य चालू आहे, तो थांबवण्यासाठी हा मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे.

धर्मरक्षणाकरता सर्वांनी एकत्र व्हावे ! – सुदर्शन कपाटे महाराज, महानुभाव पंथ, छत्रपती संभाजीनगर.

मोर्च्याचे रूपांतर सभेत झाल्यानंतर मार्गदर्शन करतांना हिंदुत्वनिष्ठ 

क्षणचित्रे

१. संभाजीनगर शहरातील प्रमुख मार्गांवरून शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा काढण्यात आला.
२. मोर्च्यात हिंदु महिला आणि पुरुष यांनी हातात भगवे झेंडे घेतले होते, तसेच डोक्यावर भगवी टोपी परिधान केली होती. त्यामुळे संपूर्ण शहरात भगवेमय वातावरण झाले होते.
३. हिंदू आणि हिंदु नेत्यांवरील अत्याचारांचा निषेध करणारे फलक हिंदूंनी हातात घेतले होते.