१२ खासदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देहलीत पत्रकार परिषद !

उद्धव ठाकरे यांनाही युती करायची होती ! – खासदार राहुल शेवाळे यांचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी देहली – शिवसेनेच्या १२ खासदारांचा स्वतंत्र गट स्थापण्यात येणार असून त्यांनी त्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. स्व. बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेऊन आम्ही भाजप-शिवसेना या नैसर्गिक युतीचे सरकार स्थापन केले. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील या सरकारला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी देहली येथे पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी त्यांनी लोकसभेचे गटनेते म्हणून खासदार राहुल शेवाळे आणि पक्ष प्रतोद म्हणून खासदार भावना गवळी यांची नावे त्यांनी घोषित केली. ‘ओबीसी’ आरक्षणाविषयी अधिवक्त्यांशी चर्चा केल्याचेही या वेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शिंदे या वेळी म्हणाले की, सरकार आल्यावर शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना ५० सहस्र रुपये देण्याचा निर्णय, पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल ३ रुपये न्यून करण्याचा निर्णय असे अनेक निर्णय घेतले आहेत. शिवसेनेच्या सर्व १८ खासदारांना प्रतोद भावना गवळी यांचाच ‘व्हीप’ लागू होईल. विधानसभेत आम्हाला शिवसेनेचा गट म्हणून मान्यता मिळाली आहे, तशीच लोकसभेतही मिळेल. आम्ही कुठलेही नियमबाह्य काम केलेले नाही.

या वेळी खासदार राहुल शेवाळे यांनी ‘उद्धव ठाकरे यांनाही युती करण्याची इच्छा होती’, असे सांगून गौप्यस्फोट केला.

खासदार राहुल शेवाळे यांनी मांडलेली सूत्रे

१. वर्ष २०१९ मध्ये भाजप-शिवसेना युतीत मताधिक्याने निवडून आल्यावर जो करार झाला होता, त्यातील जनतेच्या कामांची सूत्रे मविआच्या ‘कॉमन मिनिमम प्रोग्रॅम’मध्ये नव्हती.

२. मविआमध्ये विरोधी उमेदवारांना ताकद देण्याचे काम झाले, तांत्रिक विकास कामे करण्यात अडचणी येत होत्या. त्या वेळी पक्षाने आम्हाला वेळ न दिल्याने आज ही वेळ आली आहे.

३. जूनमध्ये उद्धव ठाकरे यांनीही वेळोवेळी ‘भाजपशी युती करायची आहे’, असे सांगितले होते आणि त्या संदर्भात आम्हाला प्रयत्न करण्यास सांगितले होते. शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याच्या संदर्भातही बोलणे झाले होते. त्यांची पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत बैठकही झाली होती.

४. दुसरीकडे राऊत यांच्या मविआसमवेत बैठका चालू होत्या आणि मविआचा कार्यक्रम राबवला गेला.

५. त्यामुळे युतीच्या संदर्भात वारंवार चर्चा होऊन अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने भाजपचे नेतृत्व नाराज झाले.

६. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एन्.डी.ए.)तून बाहेर पडल्याचे पत्र शिवसेनेने दिलेले नाही. त्यामुळे आम्ही एन्.डी.ए.तच आहोत.