१. साधकांना वेळेचे महत्त्व सांगितल्याने प्रत्येक सत्संग वेळेत चालू होऊन वेळेतच संपणे
‘रत्नागिरी जिल्ह्यातील साधकांची व्यष्टी साधना नीट व्हावी आणि त्यांचा नामजप व्हावा’, यासाठी श्री. महेंद्र चाळके (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) अन् डॉ. (सौ.) साधना जरळी यांनी पहाटे ५.३० वाजता ‘ऑनलाईन’ नामजप सत्संग आणि भाववृद्धी सत्संग यांचे नियोजन केले आहे. त्यांनी साधकांना वेळेचे महत्त्व सांगितले. त्यामुळे सर्व साधक सत्संगाला वेळेत उपस्थित असतात. सत्संग वेळेवर चालू होतो आणि वेळेतच संपवला जातो. इतर ‘ऑनलाईन’ सत्संगही वेळेतच चालू करून वेळेतच संपवले जातात. त्यामुळे साधकांचा वेळ कुठेही वाया जात नाही.
२. सत्संगात प्रत्येक साधकाला बोलण्याची संधी देणे आणि साधकांची सर्वांसमोर बोलण्याची भीती घालवून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे
‘साधकांमध्ये सर्वांसमोर बोलण्याचा आत्मविश्वास निर्माण व्हावा’, यासाठी ‘ऑनलाईन’ सत्संगात प्रतिदिन वेगवेगळ्या साधकांना प्रार्थना आणि भावप्रयोग सांगण्याची संधी दिली जाते. साधकही उत्साहाने भावप्रयोग सांगून त्यातील आनंद घेतात. त्यामुळे साधकांची सर्वांसमोर बोलण्याची भीती न्यून होण्यास साहाय्य झाले.
३. तत्त्वनिष्ठता
श्री. महेंद्रदादा आणि सौ. साधनाताई यांच्यामध्ये तत्त्वनिष्ठता आहे. ते कोणताही प्रसंग भावनेच्या स्तरावर हाताळत नाहीत. ते साधकांना त्यांच्या चुका स्पष्टपणे आणि मनमोकळेपणाने सांगतात. ते स्वतःकडून झालेल्या चुकाही साधकांना विचारतात.
४. त्यांच्यामध्ये ‘मी परात्पर गुरूंचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) एक सेवक आहे’, असा भाव असल्यामुळे ‘त्यांच्यात अहं अल्प आहे’, असे मला वाटते.
५. महेंद्रदादा आणि साधनाताई यांच्यातील सहजता अन् सकारात्मकता यांमुळे ते घेत असलेल्या सत्संगात साधकांना आनंद मिळणे
महेंद्रदादा आणि साधनाताई सत्संगात सकारात्मकतेने आणि सहजतेने सूत्रे सांगतात. ते साधकांना साधनेचे योग्य दृष्टीकोन देऊन ती सूत्रे साधकांच्या मनावर बिंबवतात. त्यामुळे साधक सकारात्मक रहातात आणि त्यांना सत्संगातील आनंद अनुभवता येतो. ‘नियोजनबद्धता, सुसूत्रता आणि योग्य दृष्टीकोन’, यांमुळे सत्संगात कुठेही नकारात्मकता जाणवत नाही. ते दोघे साधकांना मनमोकळेपणे बोलण्यास आणि शंका विचारण्यास प्रवृत्त करतात. त्यामुळे ते घेत असलेला सत्संग चैतन्यदायी होतो.
६. ‘साधकांची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, अशी तळमळ असणे
महेंद्रदादा आणि साधनाताई यांना ‘साधकांची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, अशी पुष्कळ तळमळ आहे. त्यांच्या तळमळीमुळे त्यांच्याकडून येणारी स्पंदने सकारात्मक आणि चैतन्यदायी असतात. त्यामुळे साधकांमध्ये व्यष्टी साधना करण्यासाठी सकारात्मकता निर्माण होते आणि त्यांना उत्साह जाणवतो.
७. महेंद्रदादा आणि साधनाताई यांच्या भावपूर्ण बोलण्याने इतरांचीही भावजागृती होणे
साधनाताई सत्संगाच्या आरंभी भावप्रयोग आणि प्रार्थना सांगतात. त्या वेळी माझा भाव जागृत होतो. त्यांच्या बोलण्यात पुष्कळ आर्तता असल्यामुळे मला लगेच भावस्थिती अनुभवता येते.
महेंद्रदादा ‘परम पूज्य’ हा शब्द इतका भावपूर्ण म्हणतात की, तो शब्द ऐकूनच माझी भावजागृती होते आणि डोळ्यांसमोर परात्पर गुरु डॉ. आठवले उभे रहातात. ‘शरणागतभाव कसा असावा ?’, हे मला त्यांच्याकडून शिकता आले.’
– सौ. रोहिणी रमेश ताम्हनकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), रत्नागिरी (१२.४.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |