जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या

जपान हादरले !

पद्मविभूषण – शिंजो आबे

टोकियो (जपान) – जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर एका आक्रमणकर्त्याने गोळीबार करून त्यांची हत्या केली. आबे हे पश्‍चिम जपानमधील नारा शहरातील एका सभेला संबोधित करत होते. त्या वेळी आक्रमणकर्त्याने त्यांच्यावर मागून २ गोळ्या झाडल्या. ही घटना भारतीय वेळेनुसार ८ जुलैला सकाळी ८.३० वाजता घडली. आक्रमणकर्त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक बंदूक कह्यात घेण्यात आली आहे. हा आक्रमणकर्ता जपानच्या नौदलाचा माजी सैनिक असल्याचे उघड झाले आहे. या आक्रमणानंतर आबे यांना ह्रदयविकाराचा झटका आला. घटनेनंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले; परंतु २ घंट्यांनंतर त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण जपान हादरले आहे. आबे हे आतापर्यंत सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेले जपानचे पहिले आणि एकमेव पंतप्रधान आहेत. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी वर्ष २०२० मध्ये जपानच्या पंतप्रधानपदाचे त्यागपत्र दिले होते. जगभरातील विविध मान्यवरांनी आबे यांना श्रद्धांजली वाहिली. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भारताला दिली होती ५ वेळा भेट !

आतापर्यंत आबे यांनी ५ वेळा भारताला भेट दिली आहे. भारताला एवढ्या वेळा भेट देणारे ते पहिले जपानी पंतप्रधान आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या समवेत त्यांनी वाराणसी येथे गंगानदीच्या किनारी होणार्‍या गंगानदीच्या आरतीलाही उपस्थिती दर्शवली होती.

शिंजो आबे यांची आठवण !
जेव्हा भारत सरकारने दिग्गज गायक एसपी बालसुब्रमण्यम यांच्यासह माजी जपानी पंतप्रधानांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केले !

(सौजन्य : CNN-News18)  

मी शिंजो आबे यांच्या निधनाने दुःखी ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंजो आबे यांच्या निधनाविषयी दुःख व्यक्त केले.

त्यांनी ट्वीट करतांना म्हटले, ‘मी माझा सर्वांत चांगला आणि प्रेमळ मित्र शिंजो आबे यांच्या निधनाने दुःखी झालो आहे. ते एक महान जागतिक नेते आणि एक उल्लेखनीय प्रशासक होते. त्यांनी स्वतःचे जीवन जपान आणि जगाला चांगले बनवण्यासाठी समर्पित केले.’

भारताकडून १ दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या निधनानंतर भारताने उद्या, ९ जुलै या दिवशी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा घोषित केला आहे.