‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा एखाद्या गोष्टीसाठी संकल्प झाल्यावर ते कार्य सहजतेने होते’, याची प्रचीती गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण मिळवण्याची सेवा करतांना घेणारे जोधपूर येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शीतल मोदी (वय ४९ वर्षे) !

१. गुरुदेवांनी साधनेची तळमळ निर्माण केल्याने दळणवळण बंदीच्या कालावधीतही गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण मिळवण्याची सेवा करू शकणे

श्री. शीतल मोदी

आजपर्यंत मी गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) आत्मनिवेदन करून अर्पण मिळवण्याचे प्रयत्न कधीच केले नव्हते. ‘मला समाजातील व्यक्तींकडून अर्पण मिळवणे’, ही सेवा अतिशय कठीण वाटत होती; मात्र वर्ष २०२० मधील दळणवळण बंदीच्या काळात गुरुदेवांनीच माझ्याकडून साधनेचे प्रयत्न करवून घेतले. त्यांनीच माझ्यात साधनेची तळमळ निर्माण केली आणि माझी श्रद्धा वाढवली. त्यामुळे मी अर्पण मिळवण्याची सेवा करू शकलो.

२. दळणवळण बंदीच्या कालावधीत गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि गुरुदेवांच्या कृपेने लाभलेला प्रतिसाद !  

२ अ. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगून त्यांच्याकडून अर्पण मिळवणे

२ अ १. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ‘ऑनलाईन’ सत्संगाची ‘लिंक’ आणि गुरुपौर्णिमेच्या अर्पणाचे महत्त्व सांगणारी ‘पोस्ट’ पाठवणे अन् त्यांना भ्रमणभाषवर परात्पर गुरु डॉक्टरांविषयी आणि येणाऱ्या भीषण आपत्काळाविषयी सांगणे : या दळणवळण बंदीच्या कालावधीत संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन’ सत्संग चालू झाले. मी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना सत्संगाची ‘लिंक’ पाठवायला आरंभ केला. त्यानंतर देवाने माझ्या मनात ‘त्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगून त्यांच्याकडून अर्पण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे’, असा विचार घातला. तेव्हा मला परात्पर गुरु डॉक्टरांचे बोलणे आठवले. एकदा त्यांनी सांगितले होते, ‘‘आपल्याला समाजाकडून अर्पण मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्या वेळी आपण ‘आपल्याला किती प्रतिसाद मिळेल ?’, अशी अपेक्षा ठेवायची नाही. आपली सेवा म्हणून प्रयत्न करायचे. त्यामुळे आपला अहं अल्प होणार आहे.’’ मी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना गुरुपौर्णिमेच्या अर्पणाचे महत्त्व सांगणारी ‘पोस्ट’ पाठवली. मी सर्वांना भ्रमणभाषवर परात्पर गुरु डॉक्टर आणि येणारा भीषण आपत्काळ यांविषयी, तसेच वर्ष २०२५ पर्यंत हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे, याविषयी सांगितले.

२ अ २. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ‘धर्मदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे’, हे सांगितल्यावर त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळणे : ‘कार्यालयातील प्रत्येक कर्मचारी ‘गरिबांना अन्नदान करणे, गायीला चारा घालणे’, अशा प्रकारे काहीतरी दान करत असतो’, असे मला समजले. मला परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून सुचवल्याप्रमाणे मी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भ्रमणभाषवर सांगितले, ‘‘धर्मदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे आपले देवाण-घेवाण हिशोब न्यून होतात. सत्पात्री दान केल्यास प्रारब्ध न्यून होण्यास साहाय्य होते.’’ तेव्हा मला सर्वांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला. सर्वांनी त्यांच्या श्रद्धेप्रमाणे मला अर्पण द्यायला आरंभ केला. माझ्या कार्यालयातील कर्मचारी त्यांच्या वेतनातून ५ रुपयांपासून ते १० सहस्र रुपयांपर्यंत अर्पण देण्यास सिद्ध झाले. एका व्यक्तीने सांगितले, ‘‘माझे एक मासाचे वेतन अर्पण म्हणून घ्या.’’

२ आ. व्यावसायिक बंधूंना ‘एक गुरुभक्त आपल्या गुरूंसाठी झोळी पसरून अर्पण मागत आहे’, असे सांगितल्यावर सर्वांकडून पुष्कळ चांगला प्रतिसाद मिळणे : माझ्या व्यावसायिक बंधूंनी मला सांगितले, ‘‘तुम्ही आम्हाला किती अर्पण करायचे, ते सांगा. तुम्ही जितके सांगाल, तितके आम्ही अर्पण करू.’’ त्या वेळी माझ्या अंतर्मनातून शब्द आले, ‘‘आपण मला शीतल मोदी किंवा व्यावसायिक बंधू (बिझनेस असोसिएट) समजून अर्पण देऊ नका, तर ‘एक गुरुभक्त आपल्या गुरूंसाठी झोळी पसरून अर्पण मागत आहे’, असे समजा.’’ तेव्हा मला सर्वांकडून पुष्कळ चांगला प्रतिसाद मिळाला. मला अर्पण द्यायला कुणीही नकार दिला नाही.

२ इ. अर्पण मिळवण्यासाठी ‘व्यक्तींना संपर्क करायचे आहे’, असे ठरवल्यावर त्यापैकी काही व्यक्तींनी स्वतःहून भ्रमणभाष करणे : मी अर्पण मिळवण्यासाठी काही व्यक्तींच्या नावाची सूची केली होती आणि मी प्रतिदिन ध्येय ठेवत होतो की, आज त्यापैकी अमुक व्यक्तींना संपर्क करायचा आहे. मी ज्या व्यक्तींना संपर्क करायचा आहे, असे ठरवत होतो, त्यापैकी काही व्यक्ती आपणहून मला भ्रमणभाष करत असत. त्या वेळी माझी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त होत असे. मला ही अनुभूती केवळ गुरुदेवांमुळे आली.

२ ई. व्यावसायिक मतभेद असलेल्या व्यक्तींना गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितल्यावर त्यांनी अर्पण देणे आणि त्यांच्याशी असलेले व्यावसायिक मतभेद दूर होणे : माझे काही लोकांशी पुष्कळ दिवसांपासून व्यावसायिक मतभेद होते. मी त्यांना भ्रमणभाष केल्यावर ते भ्रमणभाष घेत नव्हते. परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून मला त्या व्यावसायिकांना संपर्क करायला सुचवले. त्यानंतर मी त्यांना प्रत्यक्ष संपर्क केला आणि त्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगून अर्पण करायला सांगितले. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने त्यांनी अर्पण दिले. त्यानंतर आमच्यातील मतभेद संपुष्टात आले. ही माझ्यासाठी फार मोठी अनुभूती होती. त्याबद्दल मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

३. कृतज्ञता आणि प्रार्थना !

‘परात्पर गुरु डॉक्टरांचा एखाद्या गोष्टीसाठी संकल्प झाल्यावर ते कार्य अगदी सहजतेने होते’, असे माझ्या लक्षात आले. मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांना प्रार्थना करतो, ‘त्यांनी यापुढेही माझ्याकडून असेच प्रयत्न करवून घ्यावेत.’

– श्री. शीतल मोदी, जोधपूर, राजस्थान. (२१.७.२०२०)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.