‘खुदा हाफीज : चॅप्टर २-अग्नीपरीक्षा’ या हिंदी चित्रपटाच्या निर्मात्यांची जाहीर क्षमायाचना !

चित्रपटातील गाण्यातून धार्मिक भावना दुखावल्याचा शिया मुसलमानांचा आरोप

गाण्यातून आक्षेपार्ह शब्द काढून टाकले !

मुंबई – ‘खुदा हाफीज : चॅप्टर २-अग्नीपरीक्षा’ या हिंदी चित्रपटात ‘हक हुसैन’ या गाण्यातून धार्मिक भावना दुखावण्यात आल्याच्या शिया मुसलमानांच्या आरोपानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी क्षमा मागितली आहे. या चित्रपटाची निर्मिती कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, स्नेहा बिमल पारेख आणि राम मिरचंदानी यांनी केली आहे. फारुख कबीर  हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

याविषयी निर्मात्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे, ‘‘शिया समुदायातील काहींनी ‘खुदा हाफीज : चॅप्टर २-अग्नीपरीक्षा’या चित्रपटातील गाण्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचे सांगितले आहे. याची नोंद घेत आम्ही आम्ही मनापासून क्षमा मागतो. त्यांना अनवधानाने दुखावले गेले. आम्ही आता गाण्यात पालट  करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय चित्रपट परीनिरीक्षण मंडळाशी सल्लामसलत करून आम्ही गाण्यातील आक्षेपार्ह प्रसंग काढून टाकले आहेत. आम्ही ‘हक हुसैन’ गाण्याचे बोल पालटलून ‘जुनून है’ असे केले आहेत. आम्ही सांगू इच्छितो की, चित्रपटात शिया समुदायाचे चुकीच्या पद्धतीने चित्रण केलेले नाही, तसेच शिया समुदायातील कोणत्याही व्यक्तीवर आक्रमण केले जात असल्याचे चित्रपटात दाखवण्यात आलेले नाही. ‘हक हुसैन’ हे गाणे इमाम हुसैन यांच्या गौरवासाठी अत्यंत पवित्र हेतूने सिद्ध करण्यात आले होते. कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. तरीही शिया पंथियांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही या गाण्यात आवश्यक पालट केले आहेत.’’

संपादकीय भूमिका 

मुसलमानांनी विरोध केल्यावर चित्रपट निर्माते तातडीने क्षमा मागत आक्षेपार्ह गोष्ट काढून टाकतात. याउलट हिंदूंनी कितीही विरोध केला, तरी त्यांच्या देवतांचा अवमान थांबवला जात नाही, हे ‘पीके’ यांसारख्या चित्रपटांतून अनेकदा निदर्शनास आले आहे. हिंदू सहिष्णु आणि कायद्याचे पालन करणारे असल्याचाच हा परिणाम आहे, असे कुणी म्हटल्यास आश्‍चर्य ते काय ?