आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने ३०० गाड्यांचे नियोजन !

राज्य परिवहन महामंडळाच्या आषाढी यात्रेसाठी  गाड्यांचे नियोजन

कोल्हापूर, २ जुलै (वार्ता.) – ६ ते १४ जुलै या कालावधीत पंढरपूर येथे आषाढी यात्रा होत असून १० जुलै हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. आषाढी यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश गावांतील भाविक पंढरपूर येथे प्रवास करतात. कोरोनाच्या संसर्गामुळे यात्रा न झाल्याने या वर्षी जाणाऱ्या भाविक प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात होणारी वाढ लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने ३०० गाड्यांचे नियोजन केले आहे. यात तालुक्यातील बसस्थानकातून थेट यात्रेच्या ठिकाणी आणि परत तालुक्याच्या ठिकाणी ही सेवा देण्यात येणार आहे. तरी अधिक माहितीसाठी जवळच्या आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा आणि अधिकाधिक प्रवाशांनी राज्य परिवहन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी केले आहे.