इस्कॉनच्या वतीने पुणे येथे ३ जुलैला जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सवाचे आयोजन !

पुणे – ओडिशामधील जगन्नाथ पुरी येथील रथयात्रा यंदा आषाढ मासात मोठया उत्साहात साजरी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्या वतीने ३ जुलै या दिवशी दुपारी १२ वाजता जंगली महाराज रस्त्याजवळील हॉटेल सेंट्रल पार्क येथून आयोजित जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती ‘इस्कॉन’, पुणेचे श्वेतद्वीप दास यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला अनंत गोप दास, रेवतिपती दास आदी मान्यवर उपस्थित होते. जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सवाकरता या वर्षी प.पू. लोकनाथ स्वामी महाराज, प.पू. भक्ती पुरुषोत्तम स्वामी महाराज, तसेच अनेक संन्यासी आणि महापुरुष सहभागी होणार आहेत.

सौजन्य इस्कॉन पुणे

जगन्नाथ पुरी येथे प्रत्येक जण वैयक्तिकरित्या जाऊ शकत नसल्याने इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी भगवान जगन्नाथाची यात्रा जगभर पसरवण्यासाठी रथयात्रा चालू केली. रथयात्रेच्या दिवशी इस्कॉन कात्रज-कोंढवा रस्ता, पुणे मंदिरातील भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या देवतांना खास दर्शनासाठी रथावर आणले जाते. जंगली महाराज रस्ता येथून रथयात्रेस प्रारंभ होईल आणि बालगंधर्व रंगमंदिर मार्गे हॉटेल सेंट्रल पार्क येथे रथयात्रेचा समारोप होणार आहे.

रथयात्रेतील रथाची उंची २० फूट इतकी असून फुलांसह रंगीबेरंगी कापडांनी रथावर सजावट केली जाणार आहे. हा रथ इस्कॉनचे पदाधिकारी आणि भाविक ओढणार आहेत. संपूर्ण रथयात्रेच्या वेळी अनुमाने ६० सहस्र भाविकांना महाप्रसादाच्या पाकिटांचे वाटप आणि ८ ते १० सहस्र भक्तांना भोजन दिले जाणार असून हे यंदाचे वैशिष्ट्य आहे.