पालखी सोहळ्यात समाजातील सर्वच घटकांनी योगदान देणे आवश्यक ! – अधिवक्ता विकास ढगे पाटील

सातारा, ३० जून (वार्ता.) – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा वाढत चालला असून प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणची जागा आता अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे वाढीव जागेची मागणी शासनाकडे केली आहे. पालखी सोहळा चांगल्या प्रकारे चालण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी स्वत:चे योगदान देणे आवश्यक आहे, असे आवाहन पालखी सोहळाप्रमुख अधिवक्ता विकास ढगे पाटील यांनी केले. लोणंद येथील पालखी तळावर दिंडीसमाजाची बैठक पार पडली. तेव्हा ते बोलत होते. या बैठकीला उर्जितसिंह शितोळे सरकार आणि दिंडीप्रमुख उपस्थित होते.

या वेळी दिंडीप्रमुखांनी स्वत:च्या अडचणी मांडल्या. अडचणी सोडवण्यासाठी चर्चा झाली. यामध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्यासमवेत चालणार्‍या दिंड्या आणि वारकरी यांमुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण पडत आहे. काही रथही सोहळ्यासमवेत चालत आहेत, हे योग्य नाही. दिंड्यांनी स्वत:च्या वाहनांची संख्या मर्यादित ठेवावी. वाहतूक कोंडी झाल्यामुळे जेवणाचे ट्रक वेळेत नियोजित जागेवर पोचत नाहीत, तसेच पालखी तळावर आल्यावर लगेच समाजआरती व्हावी, दिंडीत चुकलेल्या वारकर्‍यांसाठी पालखी तळावर व्यवस्था करावी, दिंडी समाजाची बैठक वर्षातून किमान ४ वेळा घेण्यात यावी, आदी विषयांवर चर्चा झाली.

माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच लोणंद येथील पालखी सोहळा मार्गावरील अतिक्रमणे हटवण्यात आली होती; मात्र पुन्हा टपर्‍या पडल्यामुळे दिंड्यांची पाले (तंबू) टाकतांना काही ठिकाणी वादावादी झाल्याची तक्रार दिंडीप्रमुख करत आहेत.