सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस ठाण्यांमध्ये आता ‘सीसीटीव्ही’ छायाचित्रकासमवेतच ‘ऑडिओ रेकॉर्डिंग’ची सुविधा केली जाणार आहे. सोलापूर शहरातील ७ पोलीस ठाण्यांमध्ये त्या दृष्टीने सोय करण्यात येत आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे लाच घेणे किंवा पैशांची मागणी करण्याचे प्रकार थांबतील, तसेच आरोप-प्रत्यारोपांची वस्तूस्थिती समजण्यास साहाय्य होईल, असा विश्वास वरिष्ठ अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी चोरांना किंवा आक्रमणकर्त्यांना पकडण्यासाठी ‘सीसीटीव्ही’ छायाचित्रकाचा वापर केला जातो; मात्र चोर किंवा आक्रमणकर्ते यांना पकडणार्या पोलीस ठाण्यांमध्येही ‘सीसीटीव्ही’ छायाचित्रक बसवावा लागणे, हे पोलीस प्रशासनाचे मोठे अपयश नव्हे का ?
सध्या मंदिर, अधिकोष, ए.टी.एम्., मॉल अशा विविध ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ छायाचित्रक बसवलेले पहायला मिळतात; मात्र ते फोडून चोरी करण्यात आल्याचेही अनेक प्रकार घडतात. मग त्याचा काय उपयोग ? ‘सीसीटीव्ही’मुळे मनुष्याच्या वागण्यात तात्पुरती कृत्रिमता येते. त्याच्यामुळे काही प्रमाणात गुन्हेगारांना पकडण्यात साहाय्य होत असले, तरी गुन्हेगारांची वृत्ती आहे तशीच आहे. चोरी, लाचखोरी, भ्रष्टाचार होऊ नये यांसाठी मनोवृत्तीतच पालट होणे महत्त्वाचे आहे.
प्रत्येक प्रशासकीय खात्यातील लाच घेणार्यांचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. नुकतेच लातूर जिल्ह्यातील वाळूचा ट्रक नियमित चालू देण्यासाठी तेथील तहसीलदाराला लाच स्वीकारतांना पकडले, तर पाणीपुरवठा योजनेतून पाईपलाईन घालण्याच्या कामाचा पाठपुरावा घेण्यासाठी ५०० रुपयांची लाच स्वीकारतांना सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील तिघांना पकडण्यात आले. लाचखोरीची अशी अनेक उदाहरणे प्रतिदिन पुढे येत आहेत. कित्येक कार्यालयांमध्ये ‘सीसीटीव्ही’ बसवण्यात आलेले आहेत; मात्र त्यामुळे ‘लाचखोरीवर नियंत्रण आले’, असे झालेले नाही. याचाच अर्थ ‘सीसीटीव्ही’ बसवल्याने लाच मागण्याचे प्रमाण न्यून होणार नसून मनुष्याच्या मूळ मनोवृत्तीत पालट होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मनोवृत्ती पालटण्यासाठी संस्कार आवश्यक आहेत. योग्य संस्कार रुजवण्यासाठी आणि ते कृतीत आणण्यासाठी धर्मशिक्षण आवश्यक आहे. प्रशासनाने याकडे लक्ष दिल्यास समाज नीतीमान होईल आणि सीसीटीव्ही सारख्या बाह्य गोष्टींची आवश्यकता भासणार नाही.
– वर्षा कुलकर्णी, सोलापूर