पाकिस्तानमध्ये एका अल्पवयीन हिंदु मुलाचे अपहरण !

पाकिस्तानमधील असुरक्षित हिंदू !

इस्लामाबाद – पाकच्या सिंध प्रांतात २८ जूनच्या सकाळी २ दुचाकीस्वारांनी आदेश कुमार नावाच्या अल्पवयीन हिंदु मुलाचे अपहरण केले. तो घराच्या बाहेर त्याच्या मित्रांसमवेत खेळत असतांना ही घटना घडली. आदेशच्या नातेवाइकांनी स्थानिक वृत्तपत्रपत्राला दिलेल्या माहितीनुसार अपहरणकर्ते दोन मुलांचे अपहरण करणार होते; परंतु त्यांनी पकडलेला दुसरा मुलगा त्यांच्या हातून निसटला. स्थानिक हिंदूंनी अपहरणकर्त्यांचा साधारण ५० किलोमीटर पाठलाग केला;परंतु ते हाती लागले नाहीत. पोलिसांनी घटनेचे अन्वेषण करून मुलाला शोधण्याचे आश्‍वासन दिले आहे.

आदेश कुमार याच्या वडिलांचे किराणामालाचे दुकान आहे. ते म्हणाले की, अपहरणकर्त्यांनी त्यांच्याशी अद्याप संपर्क साधलेला नाही. घटनेनंतर स्थानिक हिंदूंनी पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन केले. या वेळी त्यांनी ‘मुलगा सुस्थितीत परत मिळावा, तसेच अशा घटना पुढे घडू नयेत, यासाठी सुरक्षाव्यवस्था कठोर करावी’, अशी मागणीही केली.