एप्रिल २०२२ मध्ये सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस केरळ राज्यात प्रसारकार्य वाढवण्याच्या दृष्टीने केरळ येथे आले होते. मी त्यांच्या समवेत असतांना गुरुकृपेने मला शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. आनंदी
चेतनदादा हसतमुख आहेत. ते नेहमी आनंदी असतात. ‘साधकांना शिकायला मिळावे आणि त्यातून आनंद मिळावा’, असे त्यांना वाटते.
२. जिज्ञासा
दादांनी एके ठिकाणी लावलेल्या ‘समाजवादी पक्षाच्या (कम्युनिस्ट पार्टीच्या) एका फलकावर (फ्लेक्सवर) ३ तोंडवळे कुणाचे आहेत ?’, असे मला विचारले. केरळ राज्यात समाजवादी पक्षाचे फलक अनेक ठिकाणी लावलेले असतात. ते मी नेहमी पहाते; पण ‘त्या व्यक्ती कोण आहेत ?’, याविषयी मी कधी जाणून घेतले नाही. त्या फलकांवर नेहमी मार्क्स (मार्क्सवादाचा तत्त्ववेत्ता), लेनिन, स्टॅलीन (रशियाचे साम्यवादी नेते), चेगुवेरा (अर्जेंटिना येथील साम्यवादी नेता) यांची छायाचित्रे असतात. एका फलकावर एंजल्सचेही (‘दास कॅपिटल’ या मार्क्सवाद्यांच्या तत्त्वज्ञानी ग्रंथाचा सहलेखक) छायाचित्र होते. दादांनी विचारलेल्या प्रश्नातून त्यांच्यातील जिज्ञासू वृत्ती माझ्या लक्षात आली.
३. अभ्यासू वृत्ती
३ अ. दादांनी येथे येण्यापूर्वी केरळ राज्याच्या इतिहासाचा अभ्यास केला होता. त्यांनी आम्हाला त्रावणकोर येथील पूर्वीच्या राजांविषयी नवीन माहिती दिली.
३ आ. हिंदुत्वनिष्ठांच्या प्रकृतीशी जुळवून घेऊन कार्य करण्यास सुचवणे : दादांनी आम्हाला साधकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या प्रकृतीचा अभ्यास करून त्यांना ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात कसे जोडून ठेवू शकतो ?’, याविषयी सांगितले. एक हिंदुत्वनिष्ठ अनेक वर्षांपासून कार्याशी जोडले आहेत; पण त्यांच्या समवेत कार्य करण्यात आम्हाला अडचणी येत होत्या. दादांनी आम्हाला त्यांच्या प्रकृतीशी जुळवून घेऊन कार्य करण्यास सुचवले.
३ इ. साधकांना त्यांच्या प्रकृतीनुसार सेवा देण्यास सांगणे : त्यांनी आम्हाला ‘साधक ज्ञानमार्गी आहे कि भक्तीमार्गी आहे ?’, याचा अभ्यास करून त्यांना त्याप्रमाणे सेवा देण्यास सांगितली. ‘साधकांना त्यांच्या प्रकृतीनुसार सेवा देऊन त्यांना पुढे कसे नेऊ शकतो ?’, याविषयी दादांनी आम्हाला सांगितले.
४. शिकण्याची वृत्ती
चेतनदादा जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांना संपर्क करण्याची सेवा करतांना समोरची व्यक्ती जे काही सांगते, त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी केरळची स्थिती, तेथील इतिहास, तेथे साम्यवाद वाढण्याची कारणे, हिंदूंची मानसिकता इत्यादींविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दादांचे सतत वाचन आणि चिंतन चालू असते. केरळ येथील लोकांना हिंदी भाषा येत नाही आणि त्यांची इंग्रजी बोलण्याची शैली (accent [ॲक्सन्ट]) वेगळी असल्यामुळे ते कळणे कठीण आहे; पण दादांमधील ‘शिकण्याची वृत्ती, विषयाचे गांभीर्य आणि एकाग्रता’ यांमुळे त्यांना भाषा कळायची.
५. प्रेमभाव
दादा सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते असून त्यांचा अभ्यासही पुष्कळ चांगला आहे. अशा स्थितीत त्यांच्या समवेत असतांना साधकांना कसलाही ताण आला नाही. धर्मप्रेमींशी संपर्क झाल्यानंतर प्रत्येक वेळी ते आम्हाला आम्ही केलेल्या निरीक्षणाविषयी विचारायचे. ते आम्हाला आमच्या चुकाही सांगायचे. आम्हाला त्याचा ताण न येता शिकण्यातील आनंद मिळाला. ते संपर्काच्या वेळी हितचिंतकांना कृतज्ञतेने म्हणायचे, ‘‘आपल्यामुळेच आम्हाला येथील कार्यात साहाय्य मिळत आहे आणि प्रसारकार्य चालू आहे.’’
६. साधकांना प्रोत्साहन देणे
दादांनी चांगले प्रयत्न करणाऱ्या साधकांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. एकदा संपर्कासाठी जातांना एका साधिकेने तिची चारचाकी (व्हॅगनार) आम्हाला दिली. मला दुसऱ्या प्रकारची चारचाकी (टाटा नॅनो) चालवायची सवय होती. मला ‘व्हॅगनार’ चालवायला तेवढा आत्मविश्वास वाटत नव्हता, तरी मी ती चालवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दादांनी मला ‘ताई, तुम्ही धैर्य दाखवलंत, ते महत्त्वाचे’, असे सांगून प्रोत्साहन दिल्यामुळे माझी भीती उणावून माझा आत्मविश्वास वाढला.
७. गुरुकार्याचा ध्यास
चेतनदादांनी प्रसार कार्याची स्थिती, नवीन साधक सिद्ध करणे, यांविषयीची स्थिती समजून घेतली. दादांनी सेवा चांगल्या प्रकारे करणे, सर्वच स्तरांवर घडी बसवणे, नवीन साधकांना सिद्ध करणे, यांविषयी आम्हाला मार्गदर्शन केले.
केरळ राज्यातील प्रतिकूल परिस्थितीतही गुरुदेवांच्या कृपेने (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने) आम्ही शिकावे यासाठी चेतनदादा आले. ‘हे गुरुदेवा, आम्हाला त्यांच्यातील गुण शिकून आपल्याला अपेक्षित अशी समष्टी साधना करता येऊ दे’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’
– सुश्री (कु.) रश्मि परमेश्वरन् (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), कोची सेवाकेंद्र, कोची, केरळ. (२४.५.२०२२)