एकदा माझा जम्मू येथील श्री. विजय कुमार रैना यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी कुंभमेळ्यात खरेदी केलेल्या सनातन-निर्मित अत्तराविषयी सात्त्विकता अनुभवल्याचे सांगितले. त्यांनी माझ्याकडे धर्मकार्यात सहभागी होण्याची इच्छा दर्शवली.
१. श्री. विजय रैना यांच्या आईच्या निधनानंतर तिच्या पार्थिवावर शिंपडलेल्या चंदन अत्तराचा सुगंध १० दिवसांनीही अस्थीकलशातून येणे
हरिद्वार येथील कुंभमेळ्याहून घरी गेल्यानंतर १५ दिवसांनी श्री. विजय रैना यांच्या आईचे निधन झाले. आईच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांनी आईच्या पार्थिवावर वाहिलेल्या फुलांवर सनातनचे चंदन अत्तर शिंपडले होते. त्यानंतर १० दिवसांनी गंगा नदीत आईच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी ते जम्मूहून हरिद्वार येथे येत होते. तेव्हा त्यांना अस्थीकलशातून सनातनच्या अत्तराचा सुगंध आला. ‘एवढ्या दिवसांनंतरही चंदन अत्तराचा सुगंध कसा येत आहे ?’, याचे त्यांना फार आश्चर्य वाटले.
२. सनातन-निर्मित अत्तर सात्त्विक असल्याची जाणीव होऊन ‘ते पूजेसाठी वापरले पाहिजे’, असे वाटणे
त्यांना आलेल्या अनुभूतीमुळे त्यांना पुष्कळ आनंद झाला आणि त्यांच्या मनात ‘हे काहीतरी वेगळे आणि अलौकिक आहे’, असा विचार आला. तेव्हा ‘सनातनचे अत्तर सात्त्विक असल्याने ते पूजेसाठी वापरले पाहिजे’, असे त्यांना वाटले.
३. अनुभूती ऐकून भाव जागृत होणे
श्री. रैना यांची ही अद्भुत अनुभूती ऐकून माझ्या अंगावर रोमांच आले आणि माझा भाव जागृत झाला.
४. श्री. विजय रैना यांनी धर्मकार्यात सहभागी होण्याची इच्छा दर्शवणे
श्री. रैना मला म्हणाले, ‘‘मी स्वतः एक पंडित आहे. मी पूजा-अर्चा करतो. जम्मू येथील श्री वैष्णोदेवी मंदिरात जाण्यापूर्वी खाली जे गाव आहे, तेथे मी रहातो. तेथे आमचे एक मंदिरही आहे. तुम्ही आमच्या गावी आल्यावर आम्ही तुमची सर्व व्यवस्था करू. आपण धर्माचे अमूल्य ज्ञान सर्व लोकांपर्यंत पोचवू. मी तुम्हाला साहाय्य करीन.’’
५. श्री. विजय रैना यांच्याशी बोलल्यावर मनाची स्थिती सकारात्मक होणे
श्री. विजय रैना यांच्याशी बोलण्यापूर्वी माझ्या मनाची स्थिती चांगली नव्हती. ‘मी केवळ कार्य करत आहे. माझ्याकडून तेसुद्धा नीट होत नाही’, असे नकारात्मक विचार येत होते. त्या कालावधीत माझ्याकडून चुकाही झाल्या होत्या. त्यामुळे माझ्या मनात नकारात्मक विचार येते होते. नंतर ‘श्री. विजय रैना यांचा संपर्क होणे’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेच नियोजन होते’, असे माझ्या लक्षात आले. श्री. विजय यांचे बोलणे ऐकून माझ्या मनाची स्थिती पूर्णतः पालटली. माझे मन सकारात्मक झाले.
गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– श्री. कार्तिक साळुंके, देहली. (१५.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |