तव चरणी मज घेशील का रे, कान्हा  ?

श्री. देवदत्त व्हनमारे

स्वभावदोष आणि अहं मध्ये गुरफटुनी ।
सतत दुःख मिळते रे मनमोहना ।।
थकलो मी या मायेला ।
तव चरणी मज घेशील का रे, कान्हा ।। १ ।।

तुझे रूप असलेल्या गुरुदेवांचे मन दुखवले जाते सदा ।
तरी कृपाळू गुरुमाऊली जवळ घेते सदा ।।
गुरुदेवांना अपेक्षित प्रयत्न माझ्याकडून होतील का रे मधुसूदना ।
तव चरणी मज घेशील का रे, कान्हा ।। २ ।।

मनातील मायेचे विचार तुझ्यापासून सतत दूर घेऊन जातात ।
तुझ्या चरणांच्या आनंदापासून दूर नेतात ।।
तुझ्या नामाचा सतत ध्यास लागेल का रे गोविंदा ।
तव चरणी मज घेशील का रे, कान्हा ।। ३ ।।

मनातील अहंचे विचार समर्पणभावापासून दूर घेऊन जातात ।
‘कर्तेपणा’ हा अहं चा पैलू तुझ्या भावविश्वापासून दूर नेतो सदा ।।
गुरुदेवांना अपेक्षित असा कृतज्ञता अन् शरणागत भाव अनुभवता येईल का रे माधवा ।
तव चरणी मज घेशील का रे, कान्हा ।। ४ ।।

नानाविध प्रकारे साधनेच्या प्रयत्नांत सवलत घेते मन ।
साधना हे एकमात्र ध्येय आहे हे विसरून जाते मन ।।
या ध्येयाची सतत आठवण करून देशील का रे कृष्णा ।
तव चरणी मज घेशील का रे, कान्हा ।। ५ ।।

हे भगवंता, तव चरणांचा कधी न विसर पडावा ।
मज सतत सर्वत्र मिळावा तुझ्या चरणांचा विसावा ।।
एवढी कृपा करशील का रे दयाघना ।
तव चरणी मज घेशील का रे, कान्हा ।। ६ ।।

– कु. देवदत्त व्हनमारे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) (आताचे वय १७ वर्षे), सोलापूर (१७.८.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक