१. घरी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या छायाचित्राची आरती करतांना ‘त्यांना लावलेले कुंकू आणि अक्षता ओघळल्या आहेत’, असे दिसणे
‘मी १४.१.१९९९ या दिवशी सनातन संस्थेच्या संपर्कात आले. त्यानंतर १५ दिवसांत मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र घेतले आणि आमच्या बांद्रा रिक्लमेशन, मुंबई येथील निवासस्थानी ठेवले होते. वर्ष १९९९ मध्ये आमच्या घरी सत्संग व्हायचा. त्या वर्षी गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) वाढदिवसाच्या दिवशी मी त्यांच्या छायाचित्राचे औक्षण करून आरती केली. त्या वेळी ‘छायाचित्राला लावलेले कुंकू आणि अक्षता ओघळल्या आहेत’, असे मला दिसले. ‘आरती करतांना आम्हाला जसा घाम येत होता, त्याप्रमाणे छायाचित्रातील परात्पर गुरु डॉक्टरांना घाम येऊन त्यांना लावलेले कुंकू ओघळले आहे’, असे मला वाटले. (त्या वेळी उन्हाळा असूनही ‘दिवा विझू नये’, यासाठी आम्ही पंखा लावला नव्हता.)
२. देवद आश्रमात रहायला आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रात जाणवलेले पालट
२ अ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रात निर्गुणतत्त्व येणे आणि ते छायाचित्र सजीव भासणे : आम्ही देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात रहायला आल्यावर वर्ष २००६ पासून आमच्या खोलीतील देवघरात ते छायाचित्र पूजेसाठी ठेवले आहे. वर्ष २०१६ पासून मला त्या छायाचित्रात थोडे थोडे पालट जाणवू लागले, तर वर्ष २०२० पासून मला त्या छायाचित्रात अधिक प्रमाणात पालट जाणवले. त्या छायाचित्रात निर्गुणतत्त्व येऊ लागले. छायाचित्रातील परात्पर गुरु डॉक्टरांच्या सदऱ्यावरील निळ्या रंगाच्या छटांत वाढ झाली आहे. त्यामुळे ते छायाचित्र अधिक सजीव जाणवत होते.
२ आ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रातून खोलीत प्रकाश आणि चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवणे : मागील ६ मासांपासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रातील जिवंतपणा आणि निर्गुणतत्त्व यांत वाढ झाली आहे. मी परात्पर गुरु डॉक्टरांना आत्मनिवेदन करतांना ‘छायाचित्रातील गुरुदेव बोलत आणि हसत आहेत’, असे मला वाटते. माझ्याकडून काही चुका झाल्या, तर त्यांच्या तोंडवळ्यावर नाराजी दिसते. ‘पुष्कळ वेळा छायाचित्रातून खोलीत प्रकाश आणि चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवते.
३. मी रहाते त्या खोलीत नियमितपणे दैवी कण आढळतात. माझी चादर, दैनिक सनातन प्रभात, वह्या आणि कपडे यांवर पुष्कळ वेळा दैवी कण दिसतात.’
– श्रीमती स्मिता नवलकर (६१ टक्के आध्यात्मिक पातळी), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |