जेजुरी (जिल्हा पुणे) – सोपान काकांच्या सासवडमध्ये २ दिवसांच्या मुक्कामानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याने २६ जून या दिवशी जेजुरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. मल्हारी मार्तंड खंडोबाला भेटण्यासाठी वारकरी मोठे आतुर झालेले असतात. जेजुरीकरांच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. माऊलीच्या पालखीवर भंडारा उधळला गेल्यानंतर माऊलींची पालखी पिवळ्या रंगात न्हाऊन निघतांना पहायला पंचक्रोशीतील आबालवृद्ध या पालखी मार्गावर जमा झाले होते. ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषासोबतच आता ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषाने आसमंत दणाणून गेला.
ऐतिहासिक आणि आध्यात्मिक पवित्र भूमी म्हणून ओळखल्या जाणार्या सासवडमध्ये माऊलींना निरोप देतांना माऊलीची पालखी ही जेजुरी नाक्यापर्यंत खांद्यावर आणण्याची प्रथा आहे. एकूण पालखी मार्गामध्ये माऊलींच्या प्रस्थानाच्या वेळी रथातच माऊलींना निरोप दिला जायचा; मात्र सासवडकर स्वत:च्या खांद्यावरून माऊलींच्या पालखीचे प्रस्थान करतात. सासवडमध्ये पालखी खांद्यावर घेऊन नगर प्रदक्षिणा पूर्ण करण्याची प्रथा आहे. त्यानंतर पालखी गावाच्या वेशीवर आणली जाते आणि पुन्हा रथामध्ये ठेवली जाते. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा यवतवरून प्रस्थान ठेवेल. त्यानंतर वरवंडमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे.