फोंडा (गोवा) – साधकांच्या व्यष्टी साधनेचे प्रयत्न करून घेत असतांना आपण त्यांच्या दोष-अहं यांच्या निर्मूलनासह गुण आणि कौशल्य यांना दिशा दिली पाहिजे. त्याद्वारे त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीचा विचार करायला हवा. साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीतून आपली प्रगती होते. त्यांच्या साधनेच्या प्रयत्नांचा विचार आपण वाढवल्याने स्वतःचे नेतृत्व विकसित होईल. साधकांना साहाय्य केल्याने आपला प्रेमभाव वाढेल. असे करतांना आपल्या मनात कृतज्ञताभाव असेल, तर गुरु आपल्याकडून हे प्रयत्न निश्चित करवून घेतील. यासाठी साधना शिबिरामध्ये स्वतःचा सहभाग वाढवून गुरुकृपा अनुभवूया, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. २५ जून २०२२ या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या ‘साधनावृद्धी शिबिरा’त ते मार्गदर्शन करत होते. या वेळी व्यासपिठावर संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ याही उपस्थित होत्या.
शिबिराचा प्रारंभ शंखनाद करून आणि भगवान श्रीकृष्णाचा श्लोक म्हणून करण्यात आला. त्यानंतर सनातनचे संत आणि धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर, सद्गुरु नंदकुमार जाधव अन् सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
१. सद्गुरु नंदकुमार जाधव पुढे म्हणाले, ‘‘या शिबिरात स्वतःमधील दोष-अहं दूर करत आपण चैतन्याचा लाभ घेऊया. त्याचबरोबर सद्गुरु, संत आणि साधक यांच्याकडून शिकून स्वतःला पालटण्याचा प्रयत्न करूया. आताचा काळ साधनेसाठी पोषक आणि संधीकाळ आहे. गुरुपौर्णिमा जवळ येत असून गुरुतत्त्व १ सहस्र पटींनी कार्यरत आहे. त्याचा आपण झोकून देऊन लाभ घेऊया.’’
२. सद्गुरु स्वाती खाडये म्हणाल्या की, साधकांची आध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी आपण पात्र होण्याचा प्रयत्न करूया. स्वतःवर गुरुकृपा होण्यासाठी तळमळीने प्रयत्न करत मनाचा दृढनिश्चय कायम ठेवून गुरुकृपेला पात्र होऊया.
स्वतःच्या मनात रामराज्य (ईश्वरी राज्य) आले की, ते सर्वत्र येणार ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
आपण साधनेचे अधिकाधिक दायित्व घेऊन ते कसे शिकू शकतो, ते या शिबिरात प्रत्यक्ष अनुभवूयात. संपूर्ण पृथ्वीवर रामराज्य येणार आहे आणि ती प्रक्रिया ईश्वर करणारच आहे. त्याचे आपण साक्षीदार होऊया. त्यापूर्वी साधकांना स्वतःमध्ये रामराज्य आणून त्यासाठी पात्र व्हायचे आहे. एकदा साधकांमध्ये रामराज्य आले की, सर्वांमध्ये म्हणजेच वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी यांच्या मनातही ते येणार आहे. या ईश्वरी कार्यात आपल्याला साधना म्हणून सहभागी व्हायचे आहे. साधना म्हणजे कठोर तपश्चर्या असून ती अहोरात्र ध्यास घेऊन करायची आहे. याकरता गुरुकृपायोगानुसार साधना मनापासून झोकून देऊन करूया.
आपल्यामध्ये राजा भरतासारखा भाव निर्माण करूया ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
आपण साधना करतांना आपल्याला जर अहं झाला, तर साधक, साधना आणि कार्य यांची हानी होते. त्यामुळे तो निर्माण न होण्यासाठी साधकांचा भाव राजा भरताप्रमाणे हवा. त्याने अयोध्येच्या सिंहासनावर प्रभु श्रीरामाच्या पादुका ठेवून राज्यकारभार केला. तो करतांना ‘श्रीरामच हाच राजा असून मी त्याचा सेवक आहे’, असा त्याचा भाव होता. त्याने मनाप्रमाणे कोणताही निर्णय न घेता ऋषिमुनींना विचारून निर्णय घेतले. तसा भाव आपल्यात निर्माण झाला की, प्रजा (साधक) तसे करील आणि त्यांच्यातही दास्यभाव निर्माण होईल. आपण सेवक किंवा विष्णुदूत या भावाने अध्यात्मप्रसाराचे कार्य करूया.
वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे :
१. संतांनी शिबिराच्या प्रारंभी दीपप्रज्वलन केले. त्या वेळी समईतील ज्योत पिवळी दिसण्यासह तिच्याभोवती लाल रंगाचे वलय आलेले दिसत होते. या वेळी अनेक साधकांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले निर्गुण रूपात प्रकटले आहेत. ज्योतीच्या माध्यमातून साधकांना त्यांचा आशीर्वाद मिळत आहे, तसेच येणार्या आपत्काळापासून साधकांचे रक्षण होणार आहे’, असे जाणवले.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मार्गदर्शनात ‘आपण दायित्व घेऊन किती सेवा करू शकतो ? याची क्षमता देवाला ठाऊक असते’, असे वाक्य उच्चारले. त्या वेळी पाऊस चालू झाला. यामुळे वरुणदेवतेने आशीर्वाद दिल्याचे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई, उपस्थित संत आणि साधक यांना जाणवले.