योगाचे महत्त्व आणि त्यामुळे सद्यःस्थितीत होणारे लाभ

आज २१ जून २०२२ या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ आहे. त्या निमित्ताने…

भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषिमुनी, साधू-संत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे लाभ आणि त्याची आवश्यकता सांगितलेली आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर चांगले ठेवू शकतो, तसेच मनावरही चांगले संस्कार करू शकतो. ‘तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग’, असे म्हणता येईल. भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्वीकारली असून त्यांनी योगासनांमुळे होणारे लाभ मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत. जगभरातील देशांनी केवळ योग स्वीकारला नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. आताच्या घडीला संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट असतांना योगदिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

१. आंतरराष्ट्रीय योगदिनाची पार्श्वभूमी

‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ हा प्रत्येक वर्षी २१ जून या दिवशी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत ‘२१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ म्हणून साजरा करण्यात यावा’, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांच्या प्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यांसारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. या प्रस्तावावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ या दिवशी पहिला ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ जगभर साजरा करण्यात आला.

२. २१ जून या दिवसाचे महत्त्व

२१ जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वांत मोठा दिवस असतो. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे २१ जून हा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असतो. या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायण चालू होते, तसेच या दिवशी दिवस मोठा, तर रात्र लहान असते. याचसमवेत २१ जून या दिवशी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होते. म्हणून ‘हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ म्हणून साजरा करण्यात यावा’, असा प्रस्ताव मांडण्यात आला. भारताला अनुमाने ५ सहस्र वर्षांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधनेची परंपरा आहे अन् ती शरीर, तसेच मन यांमध्ये परिवर्तन घडवून आणते.

३. योगाचे सांस्कृतिक महत्त्व

भारतीय धर्म संस्कृतीमधील ‘योग’ संकल्पनेची मांडणी ‘श्रीमद्भगवद्गीता’ ग्रंथात केलेली आहे. त्याच जोडीने भगवान पतंजलि यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. ‘योगाच्या माध्यमातून आध्यात्मिक उन्नतीही साधता येते’, असे ‘पातंजल योगसूत्र’ ग्रंथात सांगितले आहे. जगभरातून स्वीकारलेले भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व या दिवसाच्या माध्यमातून अधोरेखित होते.

४. कोरोना आणि योगासने

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून भारतासह अनेक देशांनी दळणवळण बंदी (लॉकडाऊन) घोषित केली होती. कोरोनावर जरी लस उपलब्ध असली, तरी त्याच्यापासून बचाव हेच त्याच्यावरील मोठे औषध आहे. योगाच्या माध्यमातून आपल्या शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर दिला जातो. आयुर्वेदाची औषधे, होमिओपॅथी आणि अन्य गोष्टींना प्राधान्य दिले जात आहे. यासह प्रतिदिनचा नियमित व्यायाम आणि योगासने यांनाही महत्त्व दिले जात आहे. अनेक कारणांमुळे येणाऱ्या नैराश्यावर योगासने हे रामबाण औषध आहे. योगासनांमुळे शरीर आणि मन दोन्ही सशक्त अन् सक्षम होऊ शकते. त्यामुळे कोरोनाच्या विरोधातील लढाई आपण आपल्याच पद्धतीने आणखीन बळकट करू शकतो.

५. योगासने केल्यामुळे होणारे लाभ

अ. स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
आ. स्नायूंना बळ मिळते.
इ. नियमित योगासनांमुळे शरिरातील अतिरिक्त चरबी न्यून होते.
ई. पचनक्रिया सुधारते.
उ. योगामुळे तणाव दूर होतो आणि चांगली झोप लागते.

(साभार : दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनी)