पुणे येथील श्री. शशांक सोनवणे यांना हरिद्वार कुंभमेळ्यात प्रसारसेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१. श्री. कार्तिक साळुंके यांचे जाणवलेले गुण आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. कार्तिक साळुंके

१ अ. नियोजन कौशल्य : कुंभमेळ्याच्या प्रसारात कार्तिकदादांकडे फिरत्या प्रदर्शनाचे (स्टॉलचे) नियोजन होते. त्या वेळी ‘साधकांचा सेवेचा वेळ वाया जाणार नाही’, अशा प्रकारे त्यांनी फिरत्या प्रदर्शनाचे (स्टॉलचे) पूर्ण बारीकसारीक तपशीलासह उत्तम नियोजन केले. दादांना आमच्या अडचणी सांगितल्यावर ते त्या तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना कोणत्याही वेळी भ्रमणभाष केल्यावर ते तत्परतेने प्रतिसाद देत होते. प्रदर्शनाच्या ठिकाणी साहित्य संपत आल्यावर त्याची मागणी घेऊन ते साहित्य लवकरात लवकर पोचवणे इत्यादी सेवा ते तळमळीने करत होते.

१ आ. सर्व साधकांची समष्टी सेवा परिपूर्ण होऊन ‘चांगली फलनिष्पत्ती मिळावी’, यासाठी ते प्रयत्न करायचे.

१ इ. ‘प्रसाराची पुढील दिशा कशी असावी ?’, यासाठी ते अधूनमधून उत्तरदायी साधकांचे मार्गदर्शन घेत असत.

श्री. शशांक सोनवणे

२. गंगास्नानानंतर साधकाला आलेल्या अनुभूती

अ. गंगास्नान झाल्यानंतर माझे मन आणि शरीर यांवर आलेली सगळी मरगळ निघून मन अतिशय उत्साही झाले. मला नवचैतन्याची अनुभूती आली आणि समष्टी सेवा करण्यासाठी पुष्कळ ऊर्जा मिळाली.

आ. माझे मन शांत होऊन मला आनंद मिळाला.

इ. माझा नामजप एकाग्र मनाने होऊ लागला.

ई. शरिरातील उष्णता अल्प झाल्याचे जाणवले.

उ. ‘गंगास्नान करतांना मनामध्ये जितका अधिक भाव ठेवावा, तितका त्याचा आध्यात्मिक स्तरावर अधिक लाभ होतो’, असे मला जाणवले.

३. कृतज्ञता

परात्पर गुरुदेवांनी या सेवेतून माझ्या साधनेसाठी आवश्यक त्या गोष्टी मला शिकवल्या. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि उन्नत साधक यांचा सहवास अन् मार्गदर्शनही उपलब्ध करून दिले. त्यासाठी मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.

– श्री. शशांक सोनवणे, सिंहगड रस्ता, पुणे. (२६.४.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक