‘परात्पर गुरु डॉ. आठवले हेच स्वतःच्या खटल्याचे अधिवक्ता, साक्षीदार आणि न्यायाधीशही आहेत’, हे लक्षात येऊन साधिकेला कृतज्ञता वाटणे

अधिवक्त्या (सौ.) अमिता सचदेवा

१. भावजागृतीचे प्रयत्न न लिहिल्यामुळे भावजागृती सत्संगात काही सांगता न येणे आणि गुरुकृपेने ‘नेहमी समवेत छोटी नोंदवही ठेवावी’, असा विचार मनात येणे

भावजागृती सत्संगात कधी भावजागृतीचे प्रयत्न किंवा अनुभूती सांगायची असेल, तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने माझ्याकडून तो प्रयत्न लिहिला जातो. मी तो लिहिला नाही, तर सत्संगात बोलतांना मला सर्व सूत्रे आठवत नाहीत. ‘भावजागृतीचे प्रयत्न न लिहिल्यामुळे सकाळच्या भावजागृती सत्संगात मला काही सांगता आले नाही’, असे आतापर्यंत अनेक वेळा झाले आहे. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने माझ्या मनात विचार आला, ‘एक लहानशी नोंदवही नेहमी बाहेर जातांनाही समवेत ठेवावी.’ त्यांनी हा विचार मला दिला आणि त्याच दिवशी तशी संधीही दिली.

२. न्यायालयात रिकामा वेळ मिळताच परात्पर गुरु डॉक्टरांनी सुचवल्याप्रमाणे नोंदवहीत भावजागृतीचे प्रयत्न लिहिणे

न्यायालयात पोचल्यानंतर मला समजले, ‘माझा खटला (‘केस’) पाऊण ते एक घंट्यानंतर होणार आहे.’ तेव्हा परात्पर गुरुदेवांच्या कृपेने मला सुचले, ‘आता मिळालेल्या रिकाम्या वेळेत अनुभूती किंवा भावजागृतीचे प्रयत्न लिहिता येतील.’ मी वाहनतळात लावलेल्या माझ्या चारचाकीतून नोंदवही आणली. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने मला न्यायालयात बसूनच भावजागृतीचे प्रयत्न लिहिता आले.

३. एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने ‘काय लिहीत आहात ?’, असे विचारल्यावर ‘मी माझ्या श्री गुरूंविषयी लिहीत आहे’, असे सांगणे

न्यायालयातच बसून मी भावजागृतीचे प्रयत्न लिहीत असतांना एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने मला विचारले, ‘‘तुम्ही नोंदवहीत काय लिहीत आहात ? आजच्या तुमच्या खटल्याविषयी लिहीत आहात का ?’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘मी माझ्या श्री गुरूंविषयी लिहीत आहे.’’ न्यायालयात असल्यामुळे मला त्या महिला पोलीस कॉन्स्टेबलशी अधिक बोलता आले नाही.

४. ‘नोंदवहीत स्वतःच्याच खटल्याविषयी लिहीत असून त्याचे अधिवक्ता, साक्षीदार आणि न्यायाधीश परात्पर गुरु डॉक्टरच आहेत’, या विचाराने पुष्कळ कृतज्ञता वाटणे

परात्पर गुरुदेवांच्या कृपेने माझ्या मनाला जाणीव झाली, ‘या नोंदवहीमध्ये मी दुसऱ्याच्या खटल्याविषयी नाही, तर माझ्याच खटल्याविषयी लिहीत आहे. परात्पर गुरुदेवच माझ्या खटल्यातील माझे अधिवक्ता आहेत, तेच माझे साक्षीदार आहेत आणि तेच न्यायाधीशही आहेत. तेच माझा खटला लढवत आहेत, तेच ऐकत आहेत आणि निर्णयसुद्धा तेच देणार आहेत. त्यामुळे मला कसलीच चिंता नाही.’ त्यांनीच ‘मला ही जाणीव करवून दिली’, या त्यांच्या कृपेसाठी मला त्यांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता वाटली.

– अधिवक्त्या (सौ.) अमिता सचदेवा, देहली (६.३.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक