समाजात अनेकांना साधना करण्याची आवड असते. तसेच काहींना सर्वस्वाचा त्याग करून साधना करण्याची इच्छा असते. पूर्वीच्या काळी एखाद्या व्यक्तीची सर्वस्वाचा त्याग करून साधना करायची इच्छा असल्यास त्याचे आई-वडिलच त्या व्यक्तीला एखाद्या संतांकडे सुपुर्द करत किंवा त्याला संन्यास दीक्षा देत असत. हल्ली एखाद्या व्यक्तीला ईश्वरप्राप्तीसाठी सर्वस्व अर्पण करायचे असले, तरी कलियुगाच्या प्रभावामुळे निर्माण झालेला आत्यंतिक स्वार्थ आणि स्वकेंद्रित मानसिकता यामुळे त्या व्यक्तीचे नातेवाईक तिला तसे करू देत नाहीत. त्यामुळे अनेकांची ईश्वरप्राप्तीसाठी सर्वस्व अर्पण करण्याची इच्छा पूर्णच होऊ शकत नाही. मुलांनी बॉलिवूड-हॉलिवूड चित्रपटक्षेत्रात स्वतःची कारकीर्द करण्यासाठी कुणी हरकत घेत नाही. मुलगी मुसलमानाशी विवाह करत असल्यास व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली त्या कृतीचे समर्थन केले जाते; पण साधनेसाठी सर्वस्वाचा त्याग करण्याचे स्वातंत्र्य आधुनिक काळातील समाजाकडून नाकारले जाते. त्यामुळे साधनेची ओढ असलेल्या व्यक्ती सामाजिक दडपणामुळे जगरहाटीनुसार संसारात रहातात; पण तिथे त्यांचे मन न रमल्यामुळे आयुष्यभर मनातून दु:खी रहातात. त्यामुळे ईश्वरप्राप्तीसाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची भावना तीव्र असल्यास त्यानुसार कृती करणे हा कायद्याने सज्ञान व्यक्तीला दिलेला अधिकार आहे, हे लक्षात घ्या ! सर्वस्वाचा त्याग करून साधना करायची इच्छा असलेल्या व्यक्तीने तारतम्याने या सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यायला हवा.
एखाद्या व्यक्तीच्या या अभिव्यक्तीस्वातंत्र्याला कुणी विरोध करत असल्यास त्याने अधिवक्त्यांचे कायदेविषयक साहाय्य घ्यायला हवे !
– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद