‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मध्ये सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले नामजपादी उपाय

‘हिंदु जनजागृती समिती’ने १२ ते १८ जून २०२२ या कालावधीत गोव्यातील रामनाथी, फोंडा येथील ‘श्री रामनाथ देवस्थान’च्या सभागृहात आयोजित केलेले ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ म्हणजे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी होत असलेले भारतभरातील हिंदुत्वनिष्ठांचे संघटित प्रयत्न होत. या अधिवेशनात कशा बुद्धीअगम्य अडचणी आल्या आणि त्यांवर नामजपादी उपायांनी कशी मात केली, हे येथे दिले आहे.

१७.६.२०२२ या दिवशीच्या अंकात आपण ‘अधिवेशनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या दिवशी आलेल्या बुद्धीअगम्य अडचणी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेल्या नामजपादी उपायांनी कशा दूर झाल्या ?’ याविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/589007.html

सदगुरु डॉ.मुकुल गाडगीळ

१४.६.२०२२ – अधिवेशनाचा तिसरा दिवस

वाईट शक्तींनी त्रासदायक (काळी) शक्ती सोडून ‘तांत्रिक त्रुटी आहे’, हे लक्षात येऊ न देणे आणि नामजपादी उपाय करून त्रासदायक शक्ती दूर केल्यावर तांत्रिक त्रुटी लक्षात येऊन ती सुधारता येणे अन् अधिवेशनाचे चित्रीकरण ‘यू ट्यूब’ आणि ‘फेसबूक’ यांवर ‘अपलोड’ होऊ लागणे : आज सकाळी ९.३० वाजता अधिवेशनाला आरंभ झाल्यावर अधिवेशनाचे चित्रीकरण ‘यू ट्यूब’ आणि ‘फेसबूक’ यांवर ‘अपलोड’ करण्याची सेवा ज्या संगणकावर केली जात होती, त्या संगणकावर ते चित्रीकरण दिसत नव्हते. मी त्या ठिकाणी गेल्यावर मला जाणवले, ‘तेथे वरून त्रासदायक शक्तीचा प्रवाह येत आहे.’ त्यावर उपाय करण्यासाठी मी माझ्या हाताचा तळवा वरच्या दिशेने करून ‘निर्गुण’ हा जप करू लागलो. १० मिनिटे हे उपाय केल्यावर वरच्या दिशेने येणारा त्रासदायक शक्तीचा प्रवाह थांबला. त्यानंतर ती सेवा करणार्‍या साधकांना उपकरण आणि संगणक यांच्या जोडणीमधील तांत्रिक त्रुटी लक्षात आली. ती सुधारल्यावर संगणकावर अधिवेशनाचे चित्रीकरण दिसू लागले आणि अधिवेशनाचे चित्रीकरण ‘यू ट्यूब’ आणि ‘फेसबूक’ यांवर ‘अपलोड’ होऊ लागले. यावरून समजले, ‘वाईट शक्ती सोडत असलेल्या त्रासदायक शक्तीच्या प्रभावामुळे ‘तांत्रिक त्रुटी आहे’, हे लक्षातच येत नाही.’ वाईट शक्तींची त्रास देण्याची हीही एक पद्धत असल्याचे लक्षात आले. – (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (१५.६.२०२२)

१५.६.२०२२ – अधिवेशनाचा चौथा दिवस

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’चा प्रसार करत असलेल्या संकेतस्थळांना अडचण येणे, ही अडचण अन्य आस्थापनाच्या यंत्रणेमध्ये आलेल्या अडचणीमुळे आली असणे आणि ती सोडवण्यासाठी नामजपाचा उपाय केल्यावर अर्ध्या घंट्यातच ती अडचण सुटून संकेतस्थळे पुन्हा कार्यान्वित होणे : ‘संकेतस्थळांसाठी आपण एका आस्थापनाची यंत्रणा वापरतो. १५.६.२०२२ या दिवशी दुपारी ५ वाजता या आस्थापनाच्या यंत्रणेमध्ये काहीतरी अडचण आल्याने ‘सनातन संस्था’, ‘हिंदु जनजागृती समिती’, ‘बालसंस्कार’, ‘सनातन शॉप’ आणि ‘सनातन प्रभात’ यांच्या संकेतस्थळांना अडचण यायला आरंभ झाला. संबंधित आस्थापनाच्या यंत्रणेतील अडचण आपण प्रत्यक्ष सोडवू शकत नव्हतो. त्यामुळे ‘या संकेतस्थळांना आलेली अडचण म्हणजे वाईट शक्तींनी आणलेला प्रसारामधील अडथळा आहे’, असे वाटले; म्हणून मी लगेच सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांना ‘काही आध्यात्मिक उपाय करू शकतो का ?’, असे विचारले. तेव्हा त्यांनी उजव्या हाताचा तळवा डोळ्यांसमोर ठेवून ‘शून्य’ हा नामजप १ घंटा करण्यास सांगितले. हा उपाय त्यांनी ६० टक्के किंवा त्याहून अधिक पातळी असलेल्या साधकाला करण्यास सांगितला. त्याप्रमाणे एका साधिकेने दुपारी ५.३० वाजता उपाय करण्यास आरंभ केल्यावर अर्ध्या घंट्यातच संकेतस्थळांची अडचण दूर झाली. सद्गुरु डॉ. गाडगीळकाकांच्या माध्यमातून देवानेच संकेतस्थळांशी संबंधित ही अडचण सोडवली. यासाठी आम्ही सर्व साधक देव आणि सद्गुरु डॉ. गाडगीळकाका यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. रोहन मेहता, संकेतस्थळ विभाग (१६.६.२०२२)

१६.६.२०२२ – अधिवेशनाचा पाचवा दिवस

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांच्या कमरेत डावीकडे चमक भरत असणे, त्यांना अधिवेशनात विषय मांडायचा असणे आणि त्यांच्यावर अर्धा घंटा नामजपादी उपाय केल्यावर त्यांचा तो त्रास बर्‍याच प्रमाणात न्यून होणे : ‘आज सकाळी ९.३० वाजता अधिवेशनाला आरंभ होतांना कळले, ‘हिंदु जनजागृती समितीचे एक धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांना आज सकाळी १०.३० वाजता अधिवेशनात विषय मांडायचा आहे आणि त्यांच्या कमरेत डावीकडे चमक भरत आहे.’ त्यामुळे मी त्यांच्यासाठी नामजपादी उपाय करू लागलो. मला माझ्या कमरेवर ‘त्यांना कुठे त्रास होत आहे’, हे जाणवत होते. मी त्यावर उपाय शोधले आणि ‘मधल्या बोटाच्या टोकाला अंगठ्याचे टोक लावणे’ ही मुद्रा करून त्या ठिकाणी न्यास करू लागलो, तसेच ‘ॐ ॐ श्री अग्निदेवाय नमः ॐ ॐ ।।’ हा जप करू लागलो. अर्धा घंटा हा उपाय केल्यावर मला पू. नीलेशदादा यांचा तो त्रास दूर झाल्याचे जाणवले. त्यांना प्रत्यक्ष विचारल्यावर खरोखरच त्यांचा तो त्रास बर्‍याच प्रमाणात न्यून झाला होता.

१७.६.२०२२ – अधिवेशनाचा सहावा दिवस

अधिवेशनस्थळातून संगणकात ठेवलेल्या भाषणांच्या चित्रीकरणातून महत्त्वाचे २ – २ मिनिटांचे चित्रीकरण त्या त्या वेळी प्रसारासाठी साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांना पाठवण्यात येत असल्याने चित्रीकरण संगणकात ठेवण्यात वाईट शक्ती सतत अडथळे आणत असणे आणि यावर उपाय केल्यावर पुन्हा त्यामध्ये अडथळा न येणे : आज मी अधिवेशनस्थळी सकाळी ९ वाजता पोचलो. अधिवेशनाला अजून आरंभ व्हायचा होता. अधिवेशनाच्या भाषणांचे चित्रीकरण ‘कॉपी’ करून तो ‘डाटा’ संगणकात ठेवला जात असलेल्या सेवेच्या ठिकाणी मी गेलो. तेथे साधकांनी मला काल सायंकाळी अधिवेशन चालू असतांना ‘डाटा’ संगणकात ठेवतांना पुष्कळ अडचणी आल्याचे सांगितले. मी सूक्ष्मातून निरीक्षण केल्यावर जाणवले, ‘डाटा’ पाठवण्यासाठी ‘इंटरनेट’ लागते, त्या उपकरणावर पुष्कळ काळी शक्ती येत होती. मी माझ्या उजव्या हाताचा तळवा त्रासदायक शक्ती येत असलेल्या दिशेने करून ‘महाशून्य’ हा नामजप १० मिनिटे केला, त्या दिशेला विभूती फुंकरली आणि त्या उपकरणाभोवती विभूतीचे मंडल घातले. तसेच त्रासदायक शक्ती येत असलेल्या दिशेकडून पुन्हा त्रासदायक शक्ती येऊ नये; म्हणून त्या दिशेला तोंड करून मारुतीचे चित्र ठेवले. हे उपाय केल्यामुळे आज अधिवेशनात सकाळपासून दुपारच्या महाप्रसादाच्या वेळेपर्यंत कुठलीही अडचण आली नाही.

‘या सेवेत वाईट शक्ती एवढे अडथळे का निर्माण करत आहेत ?’, या प्रश्नाचा उलगडा होण्यासाठी मी साधकांना विचारल्यावर कळले, ‘संगणकात ठेवलेल्या भाषणांच्या चित्रीकरणातून महत्त्वाचे २ – २ मिनिटांचे चित्रीकरण त्या त्या वेळी प्रसारासाठी साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांना पाठवण्यात येत होते. त्यामुळे याला प्रतिबंध करण्यासाठी वाईट शक्ती आटापिटा करत होत्या.’ यावरून वाईट शक्तींची कूटनीती लक्षात येते.’ (समाप्त)

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१६.६.२०२२)

वाईट शक्ती आणत असलेल्या अडथळ्यांचे लक्षात आलेले स्वरूप आणि हे अडथळे दूर करण्यासाठी लाभलेली गुरु अन् देवता यांची कृपा !

‘आतापर्यंत या ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मध्ये आलेल्या अडचणी बघता सर्वाधिक अडचणी या अधिवेशनाच्या प्रसाराशी संबंधित होत्या. प्रत्यक्ष अधिवेशनामध्ये फारच थोड्या अडचणी आल्या. अधिवेशनाचा प्रसार हा ‘इंटरनेट नेटवर्क’द्वारे, म्हणजे आकाशतत्त्वाच्या माध्यमातून अतीजलद गतीने होतो. अधिवेशनामध्ये ज्या अडचणी आल्या, त्या प्रसाराशी संबंधित होत्या. यावरून लक्षात येते, ‘वाईट शक्तींनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेशी संबंधित अतीजलद प्रसाराच्या माध्यमामध्येच अडचणी निर्माण केल्या. यावरून त्या आपली सर्व शक्ती पणाला लावून आकाशतत्त्वाशी लढत आहेत.’ या दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनापूर्वी झालेल्या अधिवेशनांमध्ये अधिकतर अडथळे हे ‘सभागृहात दाब जाणवणे, विद्युत् पुरवठा खंडित होणे, वक्त्यांवर आवरण येणे’, अशा प्रकारचे येत असत. आता जसा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीचा लढा विजयाच्या दिशेने जाऊ लागला आहे, तसा वाईट शक्तींनीही आपला मोर्चा हिंदु राष्ट्राच्या प्रसाराला प्रतिबंध करण्याकडे वळवला आहे, असे दिसून येते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा, तसेच देवतांचे आशीर्वाद यांमुळे वाईट शक्तींनी आणलेले अडथळे लक्षात येऊन त्यांवर मातही करता आली. यासाठी आम्ही सर्व साधक श्री गुरु आणि देवता यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (१६.६.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.