पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटातून मुंबईला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद !

करंजाळे येथे रस्ता ७ फुटाने खचला

पुणे, २७ जुलै (वार्ता.) – माळशेज घाटाच्या अलीकडे कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर करंजाळे येथे ७ फूट रस्ता खचला असल्याने तेथील वाहतुकीमध्ये पालट करण्यात आला आहे. माळशेज घाटातून मुंबईला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली असून हा निर्णय सुरक्षिततेच्या कारणास्तव घेतल्याचे माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. या रस्त्याला २५ जुलै या दिवशी मोठी भेग पडली होती. रात्रभर झालेल्या पावसामुळे २६ जुलैला रस्त्याखालील माती वाहून गेली आणि रस्ता ७ फुटाने खाली खचला. या घटनेनंतर बांधकाम विभागाने या ठिकाणी सुरक्षा कठडे लावून एकेरी वाहतूक चालू केली होती. आता ही वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली आहे. आता पर्यायी मार्गाने म्हणजे आळेफाटा येथून नारायणगाव, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळामार्गे मुंबईला जाण्यासाठी वाहतूक वळवण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी जारी केले आहेत.