उतारवयातही स्वावलंबी, कार्यरत आणि आनंदी असलेले अलिबाग (रायगड) येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गणेश महादेव आठवले (वय ९१ वर्षे) !

‘अलिबाग येथील श्री. गणेश महादेव आठवले (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ९१ वर्षे) यांची त्यांची धाकटी सून सौ. विशाखा आठवले यांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. गणेश आठवले

१. ‘माझे सासरे (श्री. गणेश आठवले) सतत आनंदी असतात.

२. वयोवृद्ध असूनही स्वावलंबी असणे

त्यांचे वय ९१ वर्षे असूनही ते त्यांची वैयक्तिक कामे स्वतःच करतात. त्यासाठी ते कुणाचेही साहाय्य घेत नाहीत. ते प्रतिदिन स्वतःचे कपडे स्वतः धुतात.

३. व्यायामाची आवड 

ते नियमित सकाळी आणि संध्याकाळी अर्धा घंटा चालण्याचा व्यायाम करतात. ते सकाळी घराजवळील २ – ३ मंदिरांत चालत जाऊन दर्शन घेतात. ते या वयातही प्रतिदिन १२ सूर्यनमस्कार घालतात.

४. व्यवस्थितपणा 

ते त्यांची औषधे, घड्याळ आणि कपडे या सर्व वस्तू व्यवस्थित ठेवतात.

५. धार्मिक कार्याची आवड 

ते एका भजनी मंडळाचे अध्यक्ष आहेत, तसेच ते एका मंदिराचे कोषाध्यक्षही आहेत. ते मंदिराच्या संदर्भातील सर्व लेखाजोखा (हिशोब) व्यवस्थित लिहून ठेवतात. ते अधिकोषात जाणे, लेखा परीक्षणासाठी कागदपत्रे देणे (ऑडिटला) इत्यादी व्यवहार नियोजित वेळेत पूर्ण करतात.

६. स्वीकारण्याची वृत्ती

अ. त्यांची तीनही मुले अलिबाग येथेच रहातात. ते प्रत्येक मुलाच्या घरी काही मास रहातात. त्यांनी तेथील परिस्थितीशी सहजतेने जुळवून घेतले आहे.

आ. त्यांना कुणाकडूनही कसल्याच अपेक्षा नसतात किंवा त्यांचा ‘एखादा अन्नपदार्थ हवा’, असा अट्टहास नसतो. कधी एखाद्या अन्नपदार्थात तिखट किंवा मीठ अल्प-अधिक झाले, तरीही ते कोणतेही गार्‍हाणे न करता तो अन्नपदार्थ ग्रहण करतात.

इ. घरातील कुणाकडूनही काही चूक झाली, तरीही ते नंतर विसरून जातात आणि त्या व्यक्तीशी ते चांगलेच वागतात.

ई. त्यांना ७ वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्या वेळी ते खचून गेले नाहीत. त्यांनी जिद्दीने आणि सकारात्मक राहून त्यावर मात केली अन् ते पुन्हा पूर्वीप्रमाणे दैनंदिन कृती करू लागले.

७. नामाच्या अनुसंधानात असणे

ते प्रतिदिन सकाळी १.३० घंटा सप्तदेवतांचा (श्रीराम, मारुति, शिव, श्री दुर्गादेवी, श्री गणपति, दत्त आणि श्रीकृष्ण यांचा) नामजप करतात. त्यांचा पूर्ण दिवस कुलदेवतेचा नामजप अखंड चालू असतो.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मी माझ्या सासर्‍यांची गुणवैशिष्ट्ये लिहू शकले’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. विशाखा आठवले (श्री. गणेश आठवले यांची धाकटी सून), अलिबाग, रायगड. (२९.६.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक