अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना २ ऑगस्टला ‘सार्वजनिक काका पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार !

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

पुणे – ‘पुणे सार्वजनिक सभे’चे संस्थापक कै. गणेश वासुदेव जोशी उपाख्य ‘सार्वजनिक काका’ यांच्या तिथीनुसार पुण्यतिथीनिमित्त देण्यात येणारा ‘सार्वजनिक काका पुरस्कार’ यंदा हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना घोषित करण्यात आला आहे. हा नियोजित सोहळा ३ जुलै या दिवशी पार पडणार होता; मात्र हा पुरस्कार वितरण सोहळा काही अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात आला होता. आता हा सोहळा २ ऑगस्टला सायं. ५.३० वाजता ‘सुपर्ण कार्यालय’, अरण्येश्वर चौक, पुणे येथे पार पडणार आहे. ज्येष्ठ विधीज्ञ श्री. नंदू फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होईल.

या कार्यक्रमात प्रतिवर्षीप्रमाणे गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक शिष्यवृत्तीचेही वितरण करण्यात येणार आहे. तरी सर्व सभासद, धर्मप्रेमी आणि नागरिक  यांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ‘पुणे सार्वजनिक सभे’चे अध्यक्ष श्री. विद्याधर नारगोलकर, सचिव श्री. शरद गर्भे, कार्याध्यक्ष श्री. अनिल शिदोरे आणि विश्वस्त अन् कार्यकारी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.