उद्योगाच्या यशासाठी अध्यात्माची जोड आणि साधनेची आवश्यकता अनिवार्य ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योगसमूह

विविध उद्योजकांच्या समवेत ‘पितांबरी’चे डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई

पुणे – व्यवसायात केवळ बुद्धी आणि कष्ट पुरेसे नसून त्याला अध्यात्माची जोड असणे आवश्यक आहे. ‘सेल’ (विक्री) म्हणजे माया आणि ‘प्रॉफिट’ (लाभ) म्हणजे ब्रह्म आहे’, हे सूत्र लक्षात घेऊन उद्योजकांनी मार्गक्रमण करायला हवे, असे विधान ‘पितांबरी उद्योग समुहा’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले. कोथरूड येथील पुण्याई सभागृहात आयोजित ‘रिजनल कोऑर्डिनेटर’च्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या वेळी डॉ. प्रभुदेसाई यांनी उद्योजकांसाठी साधनेचे महत्त्व अधोरेखित करतांना खालील महत्त्वपूर्ण सूत्रे मांडली.

१. व्यवसायातील ७५ टक्के अडथळे प्रारब्धामुळे, तर २५ टक्के प्रयत्नांमुळे असतात. या प्रारब्धावर मात करण्यासाठी साधनाच उपयुक्त ठरते. पितांबरीच्या प्रगतीमागे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी दिलेले ज्ञान आणि आध्यात्मिक शास्त्र यांचा मोठा वाटा आहे.

२. ताणतणाव आणि अडथळे दूर करण्यासाठी कुलदेवतेचा नामजप आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ हा जप अत्यंत महत्त्वाचा आहे. अध्यात्म हे अनुभवाचे शास्त्र आहे. नामस्मरणामुळे पंचतत्त्वांचे व्यवस्थापन अधिक स्पष्ट होते. साधनेमुळे सूक्ष्म बुद्धी जागृत होऊन नवीन संधी ओळखता येतात.

३. पितांबरीमध्ये प्रतिदिन भीमरूपी स्तोत्र, प्रार्थना आणि नामस्मरण केले जाते. प्रत्येक उद्योजकाने स्वत:च्या कामाच्या ठिकाणी असे वातावरण निर्माण करायला हवे. वैयक्तिक प्रगतीसोबत राष्ट्र आणि समाजाची प्रगती (समष्टी साधना) महत्त्वाची आहे.

४. उद्योजकांसाठी निर्भयता, प्रामाणिकपणा, कर्तृत्व हे ३ गुण अत्यंत आवश्यक आहेत. हे गुण केवळ वाचनाने नव्हे, तर नियमित आध्यात्मिक साधनेनेच अंगी बाणवता येतात. कारण साधनेमुळे अंतर्मन सकारात्मक होऊन निर्णयक्षमता सुधारते. या वेळी त्यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.

सामाजिक कृतज्ञता आणि योगदान

‘सॅटरडे क्लब’च्या माध्यमातून उद्योजकांनी आपल्या लाभातील काही भाग (१ टक्का) सामाजिक किंवा आध्यात्मिक कार्यासाठी देणे, ही कृतज्ञतेची भावना ‘कोऑर्डिनेटर’नी (समन्वयकांनी) सदस्यांमध्ये रुजवावी, असेही डॉ. प्रभुदेसाई यांनी नमूद केले.