बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !

कोल्हापूर – हिंदवी स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारे मावळे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे होते. त्यांच्या बळावरच त्यांनी हिंदवी स्वराज्याची कल्पना साकार केली. सिद्धी जोहरच्या गराड्यातून निसटून जाणार्‍या शिवछत्रपतींसाठी शिवरायांच्या वेशात नरवीर शिवा काशीद मृत्यूला सामोरे गेले, तर शेवटचा श्वास असेपर्यंत बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांनी घोडखिंड लढवली. त्यांचा त्याग, पराक्रम, बलीदान जागवण्यासाठी हिंदु जनजागृती समिती विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना अन् समस्त धर्माभिमानी यांच्या समवेत ‘पावनखिंड मोहीम’ राबवते. या मोहिमेतून तरुणांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करण्यासाठी प्रवृत्त व्हावे, हाच उद्देश असतो. यंदा ही मोहीम बुधवार, ३० जुलै या दिवशी सकाळी १०.३० वाजता पावनखिंड येथे होत आहे.

बाजीप्रभु देशपांडे यांच्या समाधी परिसरात होणार्‍या या मोहिमेसाठी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांची उपस्थिती लाभणार आहे. या प्रसंगी नरवीरांच्या स्मृतीला वंदन केल्यावर मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. या मोहिमेचा प्रसार सध्या कोल्हापूर आणि मलकापूर परिसरात चालू आहे. हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी प्रार्णापण करणार्‍या सहस्रो वीर मावळ्यांचा आदर्श अंगी बाणण्यासाठी सर्वांनी ३० जुलैला सकाळी १०.३० वाजता पावनखिंड येथे उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांनी केले आहे.