राजापूर (रत्नागिरी) येथे रिफायनरी प्रकल्पाची उभारणी होण्याची शक्यता !

भूमीमालकांकडून प्रकल्पासाठी ३ सहस्र एकर भूमीची संमतीपत्रे

राजापूर येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प

रत्नागिरी – जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसु येथे रिफायनरी प्रकल्प प्रकरणात ग्रामस्थांनी आता या प्रकल्पाला त्यांची भूमी देण्याचे ठरवले आहे. या प्रकल्पासाठी ३ सहस्र एकर भूमीची संमतीपत्रे जिल्हाधिकारी आणि एम्.आय.डी.सी. यांना भूमीमालकांकडून देण्यात आली. त्यामुळे राजापूर तालुक्यातील रिफायनरी प्रकल्पाची उभारणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एम्.आय.डी.सी. च्या अधिकार्‍यांनी ‘ग्रीन रिफायनरी प्रकल्पा’साठी लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. ही बैठक १३ जून या दिवशी दुपारी ४ वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीच्या अगोदरच भूमीमालकांनी त्यांच्या सातबार्‍यासह त्यांची भूमी प्रकल्पासाठी घ्यावी, अशी लेखी संमतीपत्रे सादर केली. या वेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, शिवसेना आमदार डॉ. राजन साळवी यांच्यासह अनेक प्रकल्प समर्थक उपस्थित होते.

या बैठकीच्या वेळी एम्.आय.डी.सी.च्या अधिकार्‍यांकडून कुणीही आस्थापनाकडून होणार्‍या या प्रकल्पाच्या भू सर्व्हेक्षण, ‘कोअर कट’ आणि ड्रोन सर्वेक्षण ला विरोध करू नये, या कामाला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली, तसेच या प्रकल्पाविषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली.

राजापूर तालुक्यातील या रिफायनरीला मोठ्या प्रमाणात स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला होता. त्या वेळी या प्रकल्पाला विरोध करणार्‍या आंदोलकांना पैसा कुठून येतो ? असा प्रश्‍न उपस्थित केला जात होता. यानंतर या रिफायनरी प्रकल्पाविषयी चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधींना बोलावले होते. या परिसरातील ११ ग्रामपंचायत सरपंचापासून ते जिल्हा परिषद सदस्य यांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आले होते. या बैठकीवर रिफायनरी विरोधी समितीने बहिष्कार घातला होता. या बैठकीला सरपंच जाणार नाहीत, असा रिफायनरी विरोधी समितीचा निर्धार असल्याचेही समोर आले होते; मात्र आता कोणताही वाद न होता रिफायनरी प्रकरणात भूमीमालकांनी प्रकल्पाला भूमी देण्याचे ठरवण्यात आले.

आमदार साळवी म्हणाले की, या प्रकल्पाला स्थानिक काही ग्रामस्थांचा विरोध होता. त्यांचा संभ्रम दूर करण्यासाठीच आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर हा प्रकल्प आता होईल, असे वाटत आहे. या प्रकल्पाला आता विरोध नसावा.