वटपौर्णिमा

वटपौर्णिमा हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमा या तिथीला करतात. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे; म्हणून स्त्रियांनी या व्रताचा आरंभ केला. भरतखंडात प्रसिद्ध असलेल्या पतिव्रतांपैकी सावित्री हीच आदर्श मानलेली आहे. तसेच तिला अखंड सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते. वटपौर्णिमा या व्रताची मुख्य देवता सावित्रीसह ब्रह्मदेव असून सत्यवान, नारद आणि यमधर्म या उपांग (गौण) देवता आहेत.

वटपौर्णिमा हे व्रत करण्याची पद्धत

अ. संकल्प : प्रथम सौभाग्यवती स्त्रीने ‘मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’, असा संकल्प करावा.

आ. पूजन : वडाचे षोडशोपचारे पूजन करावे. पूजेत अभिषेक झाल्यानंतर वडाला सूत्रवेष्टन करावे, म्हणजे वडाच्या खोडाभोवती सुती धाग्याने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तीनदा गुंडाळावे. पूजेच्या शेवटी ‘अखंड सौभाग्य लाभू दे, जन्मोजन्मी हाच पती लाभू दे, तसेच धनधान्य आणि कुल यांची वृद्धी होऊ दे’, अशी सावित्रीसह ब्रह्मदेवाला प्रार्थना करतात.

इ. उपवास : स्त्रियांनी संपूर्ण दिवस उपवास करावा.

(अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे म्हणजे अंनिसचे कार्यकर्ते ‘वटपौर्णिमा’ म्हणजे निवळ ‘भाकडकथा’ असा प्रचार करतात. कणाकणांत देवतांचे अस्तित्व मानून वृक्षदेवतेची पूजा करायला शिकवणारा महान हिंदु धर्म कुठे, तर हिंदु धर्माला असत्य ठरवणारे असे बुद्धीप्रामाण्यवादी, धर्मद्रोही आणि साम्यवादी कुठे !)

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सण साजरे करण्यामागील शास्त्र’)