भारतात ‘लघू कोरोना लाट’ येण्याची शक्यता ! – जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन्

नवी देहली – भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. यातच जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन् यांनी दावा केला आहे कि, भारतात काही ठिकाणी कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन सबव्हेरिअंट (उपप्रकार) बीए.४ आणि बीए.५’ वेगाने पसरत असल्याने हा ‘लघू (मिनी) कोरोना लाटे’चा आरंभ ठरू शकतो. देशात ९ जून या दिवशी ७ सहस्रांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. असेही होऊ शकते की, प्रत्येक ४-६ मासांच्या अंतराने ‘लघू कोरोना लाट’ पहायला मिळू शकते, असेही डॉ. स्वामीनाथन् यांनी सांगितले.

‘ओमिक्रॉन’ उपप्रकाराच्या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती !

  • या उपप्रकारामध्ये यापूर्वी कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांनाही पुन्हा बाधित करण्याची क्षमता आहे.
  • लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले असल्यामुळे नव्या उपप्रकारामुळे गंभीर स्वरूपाची प्रकरणे निर्माण होणार नाहीत.
  • ज्या व्यक्ती सर्वाधिक जोखमीच्या वर्गवारीत आहेत आणि ज्यांनी कोरोनाविरोधी लस घेतलेली नाही, अशाच व्यक्तींना याचा गंभीर त्रास होऊ शकतो.
  • अधिक धोका असलेल्या ६० वर्षांवरील नागरिकांना ‘बूस्टर डोस’ देणे आवश्यक आहे.